जामखेड न्युज——
आई वडिलांचे छत्र हरपलेले असताना जिद्द, चिकाटी व मेहनतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा केली सर
प्रतिकुल परिस्थितीत संघर्ष करत शामराव भोसले यांची वैधमापनशास्त्र निरीक्षकपदी निवड
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या वैधमापन शास्त्र निरीक्षक या पदासाठी जामखेड तालुक्यातील जवळा येथील शामराव भोसले यांची निवड झाली आहे. ही परीक्षा २०२३ मध्ये घेण्यात आली होती. राजपत्रित अधिकारी वर्ग दोन या पदावर त्यांची शासनाकडून नियुक्ती केली जाणार आहे.
शामराव भोसले यांनी पुण्यात राहून स्पर्धा परीक्षेची तब्बल ९ वर्षे खडतर अभ्यास केला. यादरम्यान आलेल्या अपयश आणि अडचणींवर मात करत अथक परिश्रम, सातत्य व जिद्दीतून त्यांनी यशाला गवसणी घातली आहे.
शामराव भोसले हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असून, घरची बेताची परिस्थिती, त्यातच लहानपणीच वडिलांचे छत्र हरवले. अशा परिस्थितीत आईने कष्ट करून मुलांना मोठे केले. आईने पडेल ते काम करत ,काबाडकष्ट करून मुलांना शिक्षण दिले. यादरम्यान शामराव यांच्या आईचे २०११ साली निधन झाले. अशा परिस्थितीत न खचता शामरावने जिद्दीने शिक्षण घेत मेकॅनिकल इंजिअरिंगची पदवी मिळवली.
पदवी अभ्यासक्रम पुर्ण करत असतानाच शामराव यांना स्पर्धा परीक्षा देण्यास सूरूवात केली. घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असताना देखील ध्येय गाठायचे हे ठरवून इंजिनिअरिंग नंतर नोकरीचा विचार न करता २०१५ पासून स्पर्धा परीक्षेची पुण्यात तयारी सुरू केली.
आर्थिक अडचणी असल्याने क्लासेस न लावता सेल्फ स्टडी वर भर दिला. त्यातून त्यांनी राज्यसेवेच्या पोलीस उपनिरिक्षक पदासाठी गेल्या ७-८ वर्षात अनेक परीक्षा दिल्या. पोलीस उपनिरिक्षक पदासाठी ते तीन वेळा मुलाखतीपर्यंत जाऊन आले. पाच वेळा मुख्य परीक्षा दिली होती. राज्यसेवा व इतर परीक्षेतही त्यांनी चांगले प्रयत्न केले. परंतु थोडक्या गुणांनी त्यांना यशाने हुलकावणी दिली होती.
शामराव यांचे शिक्षण विविध ठिकाणी झाले आहे. प्राथमिक शिक्षण जवळा येथे, पाचवी ते सहावी पर्यंतचे शिक्षण नगर जिल्ह्यातील आश्रम शाळेत, सातवी ते आठवीपर्यंतचे शिक्षण सोलापुरच्या शरदचंद्र पवार प्रशाला , नववी ते दहावी जवळा येथील शिवाजी विद्यालय , अकरावी ते बारावी पर्यंतचे शिक्षण प्रवरानगरच्या पद्मश्री विखे पाटील कॉलेज येथे तर पदवीचे शिक्षण मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पुण्याच्या सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग येथून झाले.
चौकट –
श्यामराव भोसले यांचे थोरले बंधु शंकर उर्फ भूषण भोसले हे जामखेड तहसील कार्यालयात शिपाई म्हणून कार्यरत आहेत. यापुर्वी त्यांनी जवळा ,मतेवाडी येथे कोतवाल म्हणून काम केले आहे.
प्रतिक्रिया —
गेल्या नऊ वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होतो. अनेकवेळा थोड्या गुणांनी यशाला हुलकावणी दिली. परंतु मी संघर्ष करत होतो आणि अखेर केलेल्या कष्टाचे चीज झाले. माझ्या लहानपणापासून आजी-आजोबा, मामा, भाऊ यांनी माझ्या शिक्षणाला पाठबळ दिले आहे. अनेकवेळा माझ्या जवळच्या मित्रांनी मला आर्थिक मदत केली आहे. माझ्या यशात त्यांचा देखील वाटा आहे.
— शामराव भोसले