जामखेड न्युज——-
अवैध मद्य, पैसे किंवा प्रलोभनासाठी उपयोगात येणाऱ्या भेट वस्तूंच्या वाहतूकीला प्रतिबंध
जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील जिल्हाधिकाऱ्यांची बैठक संपन्न
जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या जिल्ह्यांमधील पोलीस, उत्पादन शुल्क आणि परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने आणि प्रभावीपणे वाहनांची तपासणी करून अवैध मद्य, पैसे किंवा प्रलोभनासाठी उपयोगात येणाऱ्या भेटवस्तूंच्या वाहतूकीला प्रतिबंध करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस अपर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर प्रशांत खैरे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील आणि दूरदृष्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी अविनाश पाठक, डॉ.सचिन ओम्बासे, पोलीस अधीक्षक संजय जाधव, अविनाश बारगळ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.शशिकांत मंगरुळे, देवेंद्र कटके आदी उपस्थित होते.
शेजारील जिल्ह्यातील यंत्रणांनी समन्वयाने काम केल्यास त्याचे चांगले परिणाम दिसतील. निवडणुकीतील गैरप्रकार टाळण्यासाठी अवैध मद्य आणि पैशाच्या वाहतुकीवर कठोरपणे प्रतिबंध करणे आवश्यक असल्याने आवश्यक त्या ठिकाणी स्थिर सर्वेक्षण पथके तैनात करण्यात येतील, त्यासाठी शेजारील जिल्ह्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सालीमठ यांनी केले.
बीड जिल्ह्याला लागून असलेल्या भागात दोन जागी पोलीसांचे पथक तैनात असून स्थिर सर्वेक्षण पथकासोबतही पोलीस पथक राहील, असे पोलीस अधीक्षक ओला यांनी सांगितले. पोलीस विभागातर्फे आवश्यक ती दक्षता घेण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सीमावर्ती भागात कडक बंदोबस्त ठेवण्यासाठी आवश्यक सूचना केल्या.
बैठकीस उत्पादन शुल्क, पोलीस आणि परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.