जामखेड न्युज——
जिल्ह्यात मूग, उडिद व सोयाबीन खरेदीसाठी १८ केंद्रांना मंजुरी
जिल्ह्यातील १२ केंद्रावर शेतकऱ्यांची नोंदणी सुरू
आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत जिल्ह्यासाठी पणन महासंघाने मूग, उडिद व सोयाबीन खरेदीसाठी १८ केंद्रांना मंजूरी दिली आहे. हंगाम २०२४-२५ मूग, उडिद व सोयाबीन हमीभावाने खरेदीच्या तारखा निश्चित करण्यात आल्या असून जिल्ह्यातील १२ खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पणन अधिकारी बी.आर. पाटील यांनी दिली आहे.
हंगाम २०२४-२५ साठी मूग या पिकासाठी हमीभाव ८ हजार ६८२ प्रति क्विंटल, उडिद ७ हजार ४०० प्रति क्विंटल तर सोयाबीनसाठी ४ हजार ८९२ रुपये प्रति क्विंटल हमीभावाने खरेदी करण्यात येणार आहे. मूग व उडिद पीकाची १० ऑक्टोबर २०२४ ते ७ जानेवारी, २०२५, तर सोयाबीन पिकाची १५ ऑक्टोबर २०२४ ते १२ जानेवारी, २०२५ या कालावधीत केंद्रावरुन खरेदी करण्यात येणार आहे.
जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या १८ केंद्रापैकी खालील १२ केंद्रावर शेतकऱ्यांची नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे.
शेवगाव तालुक्यामध्ये सुखायू फार्मर प्रोड्युसर कंपनी, बोधेगाव व नाथ ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी, हातगाव, पाथर्डी तालुक्यात जय भगवान स्वयंरोजगार सहकारी संस्था, मार्केट यार्ड पाथर्डी, जामखेड तालुक्यात कृषि उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड जामखेड, कर्जत तालुक्यात कर्जतकर फार्मर प्रोड्युसर कंपनी, बर्गेवाडीरोड, कर्जत, श्रीगोंदा तालुक्यात शिवदत्त फार्मर प्रोड्युसर कंपनी, घारगाव, रिअल ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी, घुटेवाडी, जय किसान फार्मर प्रोड्युसर कंपनी, मांडवगण, राहुरी तालुक्यात राहुरी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ, राहुरी, पारनेर तालुक्यात कृषि उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड पारनेर, राहाता तालुक्यात कृषि उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड राहाता, तर कोपरगाव तालुक्यामध्ये कृषि उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड कोपरगाव येथे खरेदी करण्यात येईल.
सर्व खरेदी प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी आधारकार्डची राष्ट्रीयकृत बँकेचे खाते असलेले पासबुकची छायांकित प्रत, चालू वर्षाचा ८-अ व ७/१२ उतारा आणि मूग, उडिद व सोयाबीन पिकाची नोंद असलेला ऑनलाईन पीकपेरा व चालू मोबाईल क्रमांक देणे आवश्यक आहे.
शेतकऱ्यांनी एफएक्यू दर्जाचा म्हणजेच काहीही कचरा नसलेला चाळणी करुन सुकवून माल केंद्रावर आणावा. नाफेडच्या एनसीसीएफच्या स्पेसीफिकेशननुसार शेतमालाची तपासणी करण्यात येईल.
नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना नोंदणीच्या क्रमवारीनुसार एसएमएस देऊन खरेदीसाठी बोलावण्यात येईल. देण्यात आलेल्या तारखेसच शेतकऱ्यांना माल खरेदी केंद्रावर घेऊन येणे बंधनकारक राहील, असेही कळविण्यात आले आहे.