जामखेड न्युज——
आमदार प्रा. राम शिंदे यांच्या मध्यस्थीने जायभाय पितापुत्रांचे उपोषण मागे
फसवणूक केलेली नाही – सुभाष गुळवे
बारामती अॅग्रो कंपनीने शेत जमिनीचे पैसे दिले नाही म्हणून कुंडलिक जायभाय व कृष्णा जायभाय हे पिता पुत्र कर्जत तहसील कार्यालयाबाहेर गेल्या सहा दिवसांपासून उपोषणाला बसलेले होते. अनेकांनी जायभाय यांच्या उपोषणाला पाठिंबा दिलेला होता. या प्रकरणी चौकशी साठी सतरा तारीख प्रातांधिकारी यांनी दिलेली आहे त्यामुळे तोपर्यंत उपोषण मागे घ्यावे अशी विनंती आमदार प्रा. राम शिंदे यांनी जायभाय पितापुत्राला केली यानुसार आज सहाव्या दिवशी उपोषण मागे घेण्यात आले आहे.
फसवणूक केलेली नाही – सुभाष गुळवे
बारामती अॅग्रो कंपनीने शेत जमिनीच्या खरेदी- विक्रीमध्ये कोणाचीही फसवणूक केलेली नाही. असा खुलासा बारामती अॅग्रो कंपनीचे उप व्यवस्थापक सुभाष गुळवे व अॅड. प्रसाद खारतोडे यांनी पत्रकार परीषदेत केला सध्या निवडणुकीचे वातावरण आहे त्यामुळे जायभाय यांची ही स्टंटबाजी आहे. तसेच रोहित पवार विरोधकांनी जायभाय उपोषण हे प्यादे पुढे केलेले आहे. यात काहीही तथ्य नाही.
बारामती अॅग्रो कंपनीने शेत जमिनीचे पैसे न देता आमची फसवणूक केली असल्याचा आरोप जायभाय यांनी केला आहे. तर कसलीही फसवणूक झालेली नाही असे मत सुभाष गुळवे यांनी सांगितले.
जायभाय यांच्या मते आमच्या जमीनीचे पैसे दिले नसल्याने आमची शेत जमीन आम्हाला परत मिळावी या मागणीसाठी कर्जत तहसील कार्यालयाबाहेर 1 ऑक्टोबरपासून जायभाय यांनी उपोषण सुरू केले होते. तहसीलदार गुरू बिराजदार यांनी 1 ऑक्टोबर रोजी जायभाय यांची भेट घेतली होती व आपल्या मागण्या संबंधित विभागाकडे पाठवून लवकरात लवकर पूर्ण करू असे सांगितले होते.
मात्र आंदोलकांनी आमच्या मागण्या आहेत त्यावर प्रथम निर्णय घ्यावा, आम्हाला आमची जमीन परत द्यावी अशी मागणी तहसीलदार यांच्याशी चर्चा करताना केली व जोपर्यंत आमची जमीन आम्हाला परत दिली जात नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही मागे घेणार नाही अशी भूमिका जायभाय यांनी घेतली.
आज सहाव्या दिवशी आमदार प्रा. राम शिंदे यांनी जायभाय पितापुत्राला उपोषण मागे घेण्याची विनंती केली यानुसार त्यांच्या हस्ते शरबत घेत उपोषण मागे घेतले.