जामखेड न्युज——
महागाई, बेरोजगारी, शेतमालाचे भाव या प्रश्नांकडे लक्ष देण्याऐवजी फोडाफोडी करण्यात फडणवीस व्यस्त – माजी गृहमंत्री अनिल देशमुख
सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही – रोहित पवार
विकास कामांवर स्थगिती आणणाऱ्यांना जनताच स्थगित करणार
राज्यात बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर आहे. महागाई ने जनता त्रस्त आहे. शेतीमालाला भाव नाही. दहा वर्षापुर्वी सोयाबीनला सहा हजार रुपये भाव द्यावा म्हणून शेतकरी दिंडी काढणाऱ्या फडणवीस यांना सत्तेत आल्यावर या प्रश्नांपेक्षा फोडाफोडी करण्यात जास्त रस आहे अशी टीका माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली.
जामखेड तालुक्यातील कुसडगाव येथे राज्य राखीव पोलिस दलाचे प्रशिक्षण केंद्राचा लोकार्पण सोहळ्याचे आयोजन आमदार रोहित पवार केलं होतं. मात्र या कार्यक्रमाला राज्य राखीव पोलिस दल आणि प्रशासनाने परवानगी नाकारली. यामुळे चांगलाच गोंधळ उडाला होता. अनेक कार्यकर्ते व पोलीस यांच्यात बाचाबाची झाली. महिला गेजवर चढल्या यामुळे संतापलेल्या आमदार रोहित पवार यांनी आपल्या समर्थकांसह केंद्राच्या प्रवेशद्वारासमोर एकत्र येऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार राम शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केले. यानंतर प्रवेशद्वारावर रिबन लावून पत्रकाराच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
यावेळी माजी मंत्री अनिल परब, आमदार रोहित पवार, जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुधीर राळेभात, राजेंद्र कोठारी, दत्ता वारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, संजय वराट, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट, माजी पंचायत समिती सभापती राजश्री मोरे, सुर्यकांत मोरे, मंगेश आजबे, शिवसेना तालुकाप्रमुख गणेश उगले, हनुमंत पाटील, बापुसाहेब कार्ले, सागर कोल्हे, हरिभाऊ बेलेकर, किसनराव ढवळे, काका कोल्हे, विश्वनाथ राऊत, प्रशांत राळेभात, वैजनाथ पोले यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना देशमुख म्हणाले की, एसआरपीएफ केंद्र उद्घाटनासाठी अडचणी कोणी निर्माण केल्या हे जनतेला माहीत आहे. आमदार रोहित पवार यांनी या केंद्रासाठी चिकाटीने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नामुळे हे केंद्र झाले आहे. तीन महिन्यात आपलेच सरकार येणार आहे तेव्हा मी व रोहित पवार मंत्री म्हणून येऊ व शासकीय उद्घाटन करू आमदार रोहित पवार कर्जत जामखेड मतदारसंघासाठी अहोरात्र झटत आहेत. जनतेचा विश्वास पाहता या निवडणुकीत रोहित पवार यांना एक लाख मताचे मताधिक्य राहिल असे सांगितले.
सध्याचे सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे. कारण खते, औषधे यावर १८ टक्के जीएसटी लागू आहे तर हिऱ्यांवर तीन टक्के, हेलिकॉप्टर वर पाच टक्के जीएसटी लागू आहे. शेतीमालाला भाव नाही. तीन महिन्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, कर्जत जामखेड येथून मला वेगळीच प्रेरणा मिळते, यामुळे मतदारसंघ हे माझे कुटुंब म्हणून मी जपतो. कोरोना काळात आपण गोरगरीब जनतेची सेवा करत होतो लोकांना धीर देत होतो मात्र आपले विरोधक बंगल्यात झाडांना पाणी घालत होते. साडेचार वर्षे मतदारसंघात फिरकले नाहीत आणि आता जनसंवाद यात्रा काढत आहेत.
विरोधी आमदार सुडाचे राजकारण करत आहेत. त्यांना मी सोडणार नाही. त्यांच्या काळात सामान्य माणसाचा आवाज दाबला जात होता. आजही त्यांच्या भोवती चांडाळ चौकटीच आहे. या मतदारसंघाचा पुढचा आमदार मीच असणार आहे. आणि मताधिक्यही वाढणार आहे.
राज्यात एका मतदारसंघात तीन उपजिल्हा रूग्णालय असणारा आपला एकमेव मतदारसंघ आहे. सीआरपीएफ केंद्रास कोणी पाठपुरावा केला यासाठी माझी समोरासमोर चर्चेची तयारी आहे कोणी काय प्रयत्न केले या केंद्रामुळे येथे सहा हजार पोलीस राहणार आहेत शेजारी जिल्ह्यात पोलीसांची गरज लागली की येथून जवान जाणार आहेत.
चौकट
विरोधी आमदार हे स्थगिती आमदार आहेत.
गितेबाबा, चौंडी येथील पर्यटन निधी, खर्डा किल्ला विकास निधी, विविध विकास कामांच्या मंजूर निधीवर स्थगिती आणण्याचे काम विरोधी आमदारांनी केले आहे जनताही त्यांना स्थगित करणार आहे. असे आमदार रोहित पवार यांनी आमदार प्रा. राम शिंदे यांचे नाव न घेता टीका केली.