आमदार रोहित पवारांना मोठा धक्का, दोन दिग्गजांसह अनेक कार्यकर्ते भाजपामध्ये दाखल कर्जत जामखेडचा आमदार भाजपचाच असेल – फडणवीस

0
1775

जामखेड न्युज——

आमदार रोहित पवारांना मोठा धक्का, दोन दिग्गजांसह अनेक कार्यकर्ते भाजपामध्ये दाखल

कर्जत जामखेडचा आमदार भाजपचाच असेल – फडणवीस

शरद पवार गटाचे कर्जत-जामखेड विधानसभा प्रमुख मधुकर राळेभात आणि उबाठा गटाचे तालुकाध्यक्ष संजय काशीद यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्तांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत सोमवारी हा पक्षप्रवेश पार पडला. त्यामुळे विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का मानला जात आहे.

 

याप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “कर्जत जामखेडची लढाई ही प्रस्थापितांविरुद्ध विस्थापितांची आहे. याच विस्थापितांचे नेतृत्व करणारे मधुकर राळेभात, शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद आणि त्यांच्या टीमने भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

 

यांच्यापैकी कुणीही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले नाही. जमिनीवर काम करून आणि एकएक व्यक्ती जोडून हे नेतृत्व तयार झालेलं आहे. त्यामुळे एकीकडे रामभाऊ शिंदे आणि आता आलेल्या टीममुळे या मतदारसंघात भाजपची ताकद वाढली आहे. सगळी ताकत एकवटून आपल्याला ही विस्थापितांची लढाई या विधानसभेत निर्णायकी लढावी लागेल,” असे ते म्हणाले.

कर्जत जामखेडची जागा ही भाजपचीच असेल!

“सामान्य माणसाचं दु:ख हे सामान्य माणसालाच समजतं. तसेच त्या दु:खावर फुंकर कशी मारावी हेही त्यांनाच कळतं. त्यामुळे आपल्यात वावरणारे नेते असे असतील तरच मतदारसंघातील जनतेला न्याय मिळतो. महाराष्ट्रात आपलं सरकार धडाडीने निर्णय घेत आहे. हे परिवर्तन करणारे निर्णय आहेत. आपण पाण्याच्या थेंबाथेबाबासाठी संघर्ष करत असतो.

पण आता आपण पश्चिमी वाहिन्यांचं वाहून जाणारं पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणण्यासाठी मंजुरी दिली. तसेच टेंडरही काढले. पाण्यासाठी आपापसांतले संघर्ष दूर करून अख्खा जिल्हा जलमय करण्याचे काम झाले आहे. बाळासाहेब विखे पाटील सातत्याने मागणी करत होते. मात्र काँग्रेसचे सरकार ते पूर्ण करू शकले नाही. पण आपल्या सरकारने ते पूर्ण करून दाखवलं आणि येत्या काळात हा सगळा भाग पाणीदार करणार आहे. निर्णयांची फार मोठी यादी आहे.

 

आपल्या सरकारवर जनतेचा विश्वास वाढला आहे. त्यामुळे येत्या विधानसभेत पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार. या सरकारमध्ये कर्जत जामखेडची जागा ही भाजपची असेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी बोलताना प्रा. मधुकर राळेभात म्हणाले की, पाच वर्षापूर्वी आमदार रोहित पवार यांनी जनतेला गोड स्वप्ने दाखवली कुकडीचे पाणी, मतदारसंघ बारामती सारखा करू, युवकांच्या हाताला काम देऊ पण काहीही पुर्ण केले नाही. उलट दिडशे पीए बारामतीचे आहेत. नेते व कार्यकर्ते यांना सन्मानाची वागणूक मिळत नाही. यामुळे आम्ही प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपामध्ये प्रवेश करत आहोत.

कोणी कोणी केला प्रवेश
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख प्रा. मधुकर राळेभात, नगरसेवक मोहन पवार, दिगंबर चव्हाण, अमित जाधव, महालिंग कोरे, हरीभाऊ खवळे, भगवान देवकाते यांच्या सह अनेक कार्यकर्ते तसेच जामखेड शिवसेना तालुकाप्रमुख (उबाठा) संजय काशिद, शहरप्रमुख सुरज काळे, अवी बेलेकर, वाळुंजकर
सह अनेक शिवसेना पदाधिकारी यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.

चौकट

आमदार रोहित पवार यांनी आत्मपरीक्षण करावे

मागील विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या विरोधात रोहित पवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले. पाच वर्षांत अनेक नेते यांचा योग्य मानसन्मान राखला गेला नाही म्हणून अनेकांनी आमदार रोहित पवार यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून भाजपामध्ये प्रवेश केला आहे. कर्जत आणि जामखेड विधानसभा मतदारसंघात अनेकांनी रोहित पवार यांना सोडले आहे यांचे त्यांनी आत्मपरीक्षण करावे अशी चर्चा मतदारसंघात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here