जामखेड न्युज – – – –
आषाढीच्या शासकीय महापूजेच्या वेळी मानाचा वारकरी म्हणून संधी मिळालेल्या केशव कोलते यांच्याशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतःहून आपुलकीने संवाद साधला. जिव्हाळ्याने त्यांची विचारपूस केली. त्यामुळे महापूजेच्या निमित्ताने अवघी काही मिनिटे जवळ आलेल्या ठाकरे कुटुंबीयांची आपुलकी भावल्याचे कोलते दाम्पत्याने सांगितले. श्री. कोलते म्हणाले, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माझ्यासोबत बोलले, मला त्यांनी जय हरी केला, कुठे राहता, कसे आहात असे आपुलकीने विचारले. ज्येष्ठ म्हणून आपल्याला वाकून नमस्कार केला. त्यातून त्यांचा साधेपणा दिसून आला.’
श्री. कोलते म्हणाले, पूर्वी आपण लाईटची कामे करत होतो. आपला स्पीकरचा व्यवसाय होता. त्यामुळे काही मंत्र्यांना आपण जवळून पाहिले; परंतु ठाकरे यांच्याप्रमाणे जिव्हाळ्याने कोणी बोलले नव्हते. घरचे लोक जसे आपल्याशी मोकळेपणाने बोलतात तसे श्री. ठाकरे, त्यांच्या पत्नी आणि मुलगा आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आम्हा दोघांशी बोलले, त्याचा आम्हाला आनंद झाला. सहा वर्षांपूर्वी पॅरॅलिसिस झाल्याने आपण आजारी होतो. त्या संकटातून देवाने आपल्याला नीट केले. आता आपल्याला कोणताही त्रास नाही. श्री विठ्ठल मंदिरात वीणेकरी म्हणून पूर्ववत सेवा करीत आहे. आज श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा मुख्यमंत्र्यांच्या समवेत करण्याची संधी मिळाली याचा कामाला खूप आनंद झाला. “हेची दान देगा देवा, हा कोरोना पळवा, कोरोना लवकरात लवकर दूर होऊ दे आणि सर्वांना सुखी ठेव’ अशी प्रार्थना केल्याचे श्री. कोलते यांनी सांगितले.
पूर्वी दर्शनाच्या रांगेतील एका दाम्पत्याला वारकरी प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्र्यांच्या समवेत महापूजा करण्याचा मान दिला जात असे. परंतु कोरोनाच्या सावटामुळे श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी बंद आहे. त्यामुळे गेल्या वर्षीपासून श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिरातील वीणेकरी लोकांमधून चिठ्ठी टाकून त्या दाम्पत्यास वारकरी प्रतिनिधी म्हणून महापूजा करण्याचा मान दिला जातो. केशव कोलते (वय 71) हे 1972 पासून पंढरीची वारी करत आहेत. गेल्या वीस वर्षांपासून मंदिरात वीणेकरी म्हणून सेवा करत आहेत. ही सेवा सुरू करण्यापूर्वी ते वायरमन म्हणून काम करत असत. ते मूळचे संत तुकाराम मठ, नवनाथ मंदिर पाठीमागे, वर्धा येथील आहेत.