प्रशासन व ज्येष्ठ नागरिक संघामार्फत वयोश्री योजनेचे जामखेड तालुक्यात बारा ते तेरा हजार अर्ज दाखल

0
363

जामखेड न्युज——

प्रशासन व ज्येष्ठ नागरिक संघामार्फत वयोश्री योजनेचे जामखेड तालुक्यात बारा ते तेरा हजार अर्ज दाखल

 

राज्यातील महाराष्ट्र शासनाच्या वतीने लोकाभिमुख कामांचा निपटारा करण्यासाठी दि. १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२४ या कालावधीत महसूल पंधरवडा साजरा करण्याचे धोरण जाहीर केले होते. त्यानुसार जामखेड येथील तहसीलदार गणेश माळी व तहसील कार्यालयातील कर्मचारी ज्येष्ठ नागरिकसंघ हे विविध प्रकारची शिबीरे व संस्थांच्या माध्यमातून तालुक्यातील पात्र व गरजू नागरिकांच्या लोकाभिमुख कामांचा निपटारा व विविध योजनांची माहिती खऱ्या गरजू लाभार्थ्यापर्यंत वेगवान पोहोचवण्यासाठी काम करत आहेत.

त्याच अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना तसेच मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत तालुक्यातील ६० वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना माहिती देण्यासाठी तसेच त्यांचे अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी तहसील कार्यालय जामखेड येथे तहसीलदार गणेश माळी यांच्या संकल्पनेतून विशेष शिबिर आयोजित करण्यात आले होते.

याअंतर्गत जामखेड तालुका जेष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून घेतलेल्या व महिनाभर चाललेल्या शिबीरात तब्बल १२ ते १३ हजार जेष्ठ नागरिकांचे अर्ज भरून घेतले गेले. यासाठी संघाचे अध्यक्ष तुकाराम अंदूरे, सचिव ह.गो. कदम, उपाध्यक्ष छगन खाडे, खजिनदार शांतीलाल जसाभाटी यांनी विशेष परिश्रम घेतले.

जामखेड तालुक्यात तहसिलदार गणेश माळी यांच्या आवाहनानुसार योजनेचे तालुक्यातील मंडलनिहाय अर्ज भरण्याचे काम मंडलाधिकारी प्रशांत माने (जामखेड), बाळासाहेब लटके (अरणगाव), नंदकुमार गव्हाणे (नायगाव), रवींद्र जोशी (पाटोदा), संतोष नवले (खर्डा), अभिमन्यू शिरसाठ (साकत), सुवर्णा इकडे (नान्नज) विश्वजीत चौगुले (तलाठी जामखेड) तसेच सर्व तलाठी करत आहेत. तसेच ज्येष्ठ नागरिक संघाने वयोश्री योजनेचे अर्ज भरण्यासाठी मोठी मदत केली आहे. जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी अर्ज भरून योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार गणेश माळी यांनी केले होते.

मुख्यमंत्री योजनेअंतर्गत ६५ वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना विविध सहाय्यभूत साधने घेण्याकरिता ३ हजार रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र संबंधितांकडून अर्ज भरून घेण्याकरिता दोन दिवसाच्या कॅम्पचे आयोजन प्रत्येक गावामध्ये करण्यात आले आहे.

ज्येष्ठ नागरिक संघ व तहसीलदार गणेश माळी, नायब तहसीलदार मनोज भोसेकर, नायब तहसीलदार विजय इंगळे, जामखेड मंडळाधिकारी प्रशांत माने, महादेव सानप, तलाठी विश्वजीत चौगुले, सुखदेव कारंडे, प्रशांत सलगरे आदी महसूल कर्मचाऱ्यांची उपस्थिती व सहकार्य लाभले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here