जामखेड प्रतिनिधी
कर्जत आणि जामखेड शहराने स्वच्छता सर्वेक्षणाच्या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार हिरीरीने मैदानात उतरले आहेत. जामखेडच्या ‘आरोळे हॉस्पिटलच्या आवारातील कचरा रोहित पवारांच्या नेतृत्वात साफ करण्यात आला.
जामखेडच्या ‘आरोळे हॉस्पिटल’ने कोरोना काळात मोठं योगदान दिलं. सुमारे तीन हजार लोकांची चहा नाष्टा व दोन वेळच्या जेवणाची व औषधोपचाराची मोफत सोय केली आहे. याचा परिसरातील नागरिकांना मोठा आधार मिळाला, रुग्णालय प्रशासनाने बजावलेल्या कर्तव्याची जाण ठेवत रोहित पवारांसोबत जामखेडवासी स्वच्छता मोहिमेत उतरले.
यावेळी सुमारे दोन तास आमदारांसह विद्यार्थी व कार्यकर्त्यांनी स्वच्छता केली यावेळी डॉ. रवी आरोळे, सावळेश्वर उद्योग समूहाचे अध्यक्ष रमेश आजबे, राजेंद्र कोठारी, प्रा. मधुकर राळेभात, तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, प्राचार्य विकी घायतडक, जयसिंग डोके, अमित जाधव, दिगांबर चव्हाण, महेश निमोणकर, प्रकाश सदाफुले, एनसीसीचे मयुर भोसले, फिरोज बागवान, विजय धुमाळ इस्माईल सय्यद, अॅड हर्षल डोके, अमोल गिरमे या बरोबर हॉस्पिटलमध्ये नागरिक, युवा मित्र, कार्यकर्ते, विद्यार्थी, महिला भगिनी, आरोग्य कर्मचारी यांच्यासोबत श्रमदान करुन परिसरात स्वच्छता केली, अशी माहिती रोहित पवार यांनी दिली.
आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनीही ‘स्वच्छ सर्वेक्षण’ मोहिमेत सहभाग नोंदवला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळाले होते.
जामखेड आणि कर्जत शहराने केंद्र सरकारच्या स्वच्छता परीक्षणाच्या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. या स्वच्छता अभियानात दोन्ही शहरं तयारीला लागली आहेत.
स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत शासकीय कार्यालय, अंगणवाड्या, हॉस्पिटल, हॉटेल तसेच शहरातील सर्व प्रभात यांचं मूल्यमापन होणार आहे. यामुळे आमदार रोहित पवार त्यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांनी जामखेडला स्वच्छ सर्वेक्षणात अव्वल स्थानावर आणण्यासाठी स्वच्छता अभियान सुरू केले आहे.