जामखेड न्युज——
आमदार रोहित पवारांना घेरण्यासाठी महायुतीची रणनिती, पवार विरुद्ध पवार लढत होणार?
आमदार रोहित पवारांना कर्जत जामखेड मतदारसंघात रोखून ठेवण्यासाठी महायुतीची रणनिती सुरू आहे. सध्या रोहित पवार महायुती विरोधात आक्रमक भूमिका घेत आहेत संपूर्ण राज्यात दौरा करत आहेत विधानसभेतही आक्रमकपणे बोलताना दिसत आहेत. म्हणून रोहित पवार कर्जत जामखेड मतदारसंघात कसे गुंतून राहतील यासाठी महायुती पवार विरुद्ध पवार लढत घडवून आणण्याच्या तयारीत आहे. आमदार रोहित पवार विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांना मैदानात उतरविण्यासाठी सज्ज आहेत.
लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेचे पडघम वाजू लागले आहेत. प्रत्येक राजकीय पक्ष येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी करताना दिसत आहे. राज्यात मविआ आणि महायुती यांच्यातच थेट सामना आहे. मात्र, पक्ष फुटीनंतर राज्यातील सर्वच मतदारसंघातील राजकिय गणितं बदलली आहेत. त्यातच मविआत सर्वकाही आलबेल असल्याचे वाटत असले तरी अनेक मतदारसंघात मविआमध्येही संघर्ष पाहायला मिळत आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे रोहित पवार सध्या आमदार असताना काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच स्वपक्षातील अनेक नेत्यांना व कार्यकर्त्यांना विधानसभेची जागा आपल्याला मिळावी यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. पाच वर्षे आमदार रोहित पवार यांनी आघाडीचा धर्म पाळला नाही अशी तक्रार मित्रपक्ष करत आहेत तर पाच वर्षे आम्हाला कसलेही विचारले नाही अशी स्वपक्षातील कार्यकर्त्यांची चर्चा आहे यातच अजित पवार यांनी या मतदारसंघात जास्तच लक्ष घातले आहे. जय पवार यांनी कर्जत मतदारसंघाचा दौरा केला यामुळे पवार विरुद्ध पवार लढत होईल अशी चर्चा सध्या मतदारसंघात सुरू आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांनी काल (रविवारी) कर्जत-जामखेड मतदारसंघाचा दौरा करून महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
आमदार रोहित पवार यांच्या विरोधात ते विधानसभेची निवडणूक लढविणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आमदार रोहित पवार यांच्याविरोधात पवार कुटुंबातीलच उमेदवार उभा राहतो की काय? अशी चर्चा सुरू झाली.
कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात यंदाच्या विधानसभा निवडणुकीत रंग भरण्यास सुरुवात झाली आहे. आमदार रोहित पवार यांना घेरण्यासाठी विरोधी पक्षांसह मित्रपक्षही सरसावले आहेत. नुकतेच महाविकास आघाडीतील काँग्रेस, उद्धव सेना गटाने स्थानिक कार्यकर्त्यांच्या बैठका घेत मतदारसंघावर दावा ठोकला आहे.
यासह त्यांच्यावर नाराज असणारी तिसरी आघाडीही रणांगणात उतरली आहे. त्यांनी गावनिहाय बैठका घेत राजकीय परिस्थितीचा आढावा सुरू केला आहे.
काल जय पवार यांनी राशीन येथील जगदंबा देवीच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतले. यानंतर कर्जत येथे संत गोदड महाराजंचे जन्मस्थळ व समाधी मंदिरातही त्यांनी दर्शन घेतले. सर्व ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात आला.
या दौऱ्यामध्ये जय पवार यांनी प्रवीण घुले पाटील, भाजपचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे, अशोक खेडकर, राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ओंकार गुंड यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला.
महायुती म्हणून निवडणुकीस सामोरे जाताना विद्यमान आमदार म्हणून सदरची जागा राष्ट्रवादीच्या गोटात गणली जाते. आपल्याला मतदारसंघात गुंतवून ठेवण्यासाठी विरोधी पक्ष, काका अजित पवार किंवा कोणी पवार कुटुंबातील सदस्य विधानसभेला आपल्या विरोधात उतरविला जाईल,
असे सूतोवाच दोन दिवसांपूर्वीच रोहित पवार यांनी केले होते. त्यानंतर रविवारी सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी कर्जतचा गोपनीय दौरा पार पाडला.
नितेश राणेही कर्जतमध्ये
कापरेवाडी वेस येथील हनुमान मंदिराजवळ व सिध्दटेक येथे सिध्दी विनायकाच्या मंदिराच्या बाहेर मुस्लिम धर्मीयांकडून होत असलेल्या अतिक्रमणांविरुद्ध कर्जत येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी नितेश राणे उपस्थित होते.
भल्याभल्यांना अंगावर घेण्यास तयार
माझ्या विरोधात कोणीही उभा राहा. मी भल्याभल्यांना अंगावर घेण्यास तयार आहे. जय पवार व नितेश राणे दोघेही एकाच दिवशी कर्जतमध्ये आले आहेत. राणे माझ्याविरोधात बोलण्याची शक्यता आहे, असे आमदार रोहित पवार म्हणाले होते. सध्या मात्र पवार विरुद्ध पवार लढत होईल अशीच चर्चा मतदारसंघात सुरू आहे.