जामखेड न्युज——
जामखेड तालुक्यातील या आरोपीला झाली जन्मठेपेची शिक्षा

जामखेड तालुक्यातील बाळगव्हाण शिकारे वस्ती येथील दत्त मंदिरातील पुजारी कुशाबा तुळशीराम शिकारे यांची पाच वर्षापूर्वी हत्या करण्यात आली होती. यातील आरोपी शंकर सोपान शिकारे वय 32 वर्ष राहणार बाळगव्हाण शिकारे वस्ती तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर यास दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आरोपी शंकर सोपान शिकारे वय 32 वर्ष राहणार बाळगव्हाण शिकारे वस्ती तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर यांनी पुजारी कुशाबा शिकारे यांना जीवे ठार मारल्या प्रकरणी श्रीगोंदा येथील मे.जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री एम. एस. शेख साहेब यांनी भादवी कलम 302 अन्वये आरोपी यास दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच रक्कम रुपये 5000 दंड व दंड न भरल्यास सहा महिने साधी कैदेची शिक्षा सुनावली आहे.सदर खटल्याचे कामकाज अतिरिक्त सरकारी वकील पुष्पा कापसे (गायके) यांनी पाहिले.

घटनेची थोडक्यात माहिती अशी की, बाळगव्हान शिकारे वस्ती येथील दत्त मंदिरातील पुजारी कुशाबा तुळशीराम शिकारे हे भजन कीर्तनाचे कार्य करत होते त्यांच्याकडे पुणे, मुंबई व इतर ठिकाणाहून दर्शनासाठी व अडीअडचणीची कामे सोडविण्याचे साठी लोक येत होते.

घटनेच्या दिवशी दिनांक 2/3/2019 रोजी मयत हे नेहमीप्रमाणे सायंकाळी 7:30 वाजताचे सुमारास मयताची पत्नी व मुलगा यांना मंदिराच्या दिशेने मोठ्याने ओरडल्याचा आवाज ऐकू आल्याने ते मंदिराच्या दिशेने धावले त्यावेळी आरोपी नामे शंकर सोपान शिकारे हा हातामध्ये चाकू घेऊन मंदिराच्या डाव्या बाजूने पळताना दिसला, त्यावेळी मयत कुशाबा शिकारे हे मंदिराच्या गाभाऱ्यात रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहिले असता त्यांच्या चेहऱ्यावर, मानेवर, हातावर जखमा दिसून आल्या, त्यानंतर मयताच्या मुलाने मयतास उपचारा कामी खर्डा येथे दवाखान्यात घेऊन गेले असता डॉक्टरांनी त्यांना मयत झाल्याचे घोषित केले. त्यानंतर मयताची पत्नी यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली.

सदर फिर्यादी वरून आरोपी विरुद्ध भादवी कलम 302 प्रमाणे गुन्हा नोंदविला पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी संपूर्ण तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र पाठवले तपासा दरम्यान असे निष्पन्न झाले की, आरोपीच्या आजोबांनी आत्महत्या केली होती यातील मयत कुशाबा शिकारे हा त्यांचे आत्महत्येस कारणीभूत असल्याचे संशयावरून आरोपी याने कुशाबा शिकारे यांचा खून केला.

सदर खटल्याची सुनावणी मा. जिल्हा न्यायाधीश -१ श्री मुजीब एस.शेख साहेब यांच्या न्यायालयात झाली सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने एकूण दहा साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये फिर्यादी, स्वतंत्र साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी युवराज खराडे,तपासी अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील पुष्पा कापसे (गायके) तसेच संगीता ए. ढगे यांनी काम पाहिले मा. न्यायालयासमोर आलेल्या साक्षी पुरावा व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून मा. न्यायालयाने आरोपींना वरील प्रमाणे जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पैरवी अधिकारी सौ.आशा खामकर व नामदेव रोहकले यांनी सहकार्य केले.




