मनोहर इनामदार यांच्या ‘गवसणी’ या साहित्यकृतीस सर्वोत्कृष्ट कथासंग्रहाचा राज्य पुरस्कार जाहीर महाराष्ट्र साहित्य परिषद अहमदनगर शाखेच्या पुरस्कारांचे रविवारी पद्मश्री पोपटराव पवार यांचे हस्ते वितरण

0
302

जामखेड न्युज——

मनोहर इनामदार यांच्या ‘गवसणी’ या साहित्यकृतीस सर्वोत्कृष्ट कथासंग्रहाचा राज्य पुरस्कार जाहीर

महाराष्ट्र साहित्य परिषद अहमदनगर शाखेच्या पुरस्कारांचे रविवारी पद्मश्री पोपटराव पवार यांचे हस्ते वितरण

 

जामखेड-महाराष्ट्र साहित्य परिषद अहमदनगर शाखेच्या माजी आमदार स्व. राजीव राजळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ घेण्यात आलेला राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार वितरण समारंभ रविवार दि.7जुलै 2024 रोजी सकाळी 11:00 वाजता कोहिनूर मंगल कार्यालय अहमदनगर येथे पद्मश्री पोपटराव पवार यांच्या शुभहस्ते होणार असल्याची माहिती साहित्य परिषदेचे शाखाध्यक्ष किशोर मरकड यांनी दिली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषद मुख्य शाखेच्या प्रमुख कार्यवाह सौ. सुनिताराजे पवार या राहणार असून यावेळी आ. मोनिकाताई राजळे, आ. लहू कानडे ,आ. संग्रामभैया जगताप ,साहित्य परिषदेचे विभागीय कार्यवाह जयंती येलुलकर ,परीक्षण विभागाच्या सचिव अंजली कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी लेखक व अनुवादक आमदार सत्यजित तांबे यांचे विशेष व्याख्यान आयोजित केले असून नगरमध्ये प्रथमच ते साहित्य ,समाज व विविध विषयांवर बोलणार आहेत.

शाखेतर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांमध्ये कादंबरी, कथासंग्रह,कविता संग्रह, संकीर्ण, आत्मचरित्र या राज्य पुरस्कार प्राप्त लेखकांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे. यामध्ये राज्यभरातून 300 च्या वर लेखकांनी सहभाग नोंदवला होता. त्यातून पुरस्कार निवडण्यात आले आहेत. त्यात जामखेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बांधखडक येथे प्राथमिक शिक्षक पदावर कार्यरत असलेल्या मनोहर इनामदार यांच्या ‘गवसणी’ या साहित्यकृतीस सर्वोत्कृष्ट कथासंग्रहाचा राज्य पुरस्कार जाहीर झाला आहे.

मनोहर इनामदार हे लेखक,कवी,गीतकार तसेच संत साहित्याचे अभ्यासक असून प्रवचनकार,कीर्तनकार तसेच उपक्रमशील शिक्षक म्हणून राज्यात सुपरिचित आहेत.यापूर्वी त्यांचे ‘आम्ही स्वच्छतादूत’ व ‘बिल्वदल’ या काव्यसंग्रहांसह ‘प्रेरणादायी उपक्रमांची प्रयोगशाळा’ हा शैक्षणिक लेखसंग्रह प्रकाशित झाला आहे.
या कार्यक्रमास सर्व साहित्यिक ,वाचक व साहित्यप्रेमी मंडळी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन कार्याध्यक्ष डॉ. चंद्रकांत जोशी, पुरस्कार समिती प्रमुख दशरथ खोसे, उपाध्यक्ष प्रा.शिरीष मोडक, कार्यवाह शिल्पा रसाळ, सहकार्यवाह डॉ.श्याम शिंदे, खजिनदार डॉ. शितल म्हस्के, ज्येष्ठ सदस्य राजेंद्र उदागे आदींसह कार्यकारी मंडळाने केले आहे.

इनामदार यांनी लिहिलेल्या ‘गवसणी’ या सत्यघटनाधिष्ठीत,प्रेरणादायी व ह्दयस्पर्शी अशा कथासंग्रहास सर्वोत्कृष्ट कथासंग्रहाचा राज्य पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here