जामखेड न्युज——
नीट पेपर फुटी प्रकरणात लातूरमधून आणखी दोघे ताब्यात ५० हजार ॲडव्हान्स, ५ लाखांची डील
नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी नवीन अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी संजय जाधव याला पोलिसांना पकडण्यात यश आलं आहे. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर लातूर येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात संजय जाधव यांची चौकशी सुरू आहे. पेपर फुटी प्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. यात आतापर्यंत फक्त जलील पठाण एकमेव आरोपी पोलिसांच्या ताब्यात होता. मात्र, लातूर पोलिसांना संजय जाधवला शोधण्यात यश आलं आहे. दिल्लीतील आरोपीसोबत प्रवेशपत्र घेऊन ५० हजार ॲडव्हान्स आणि संपूर्ण कामाचे ५ लाखांचे डील अशा पद्धतीने व्यवहार केल्याचे संदर्भ तपासात पुढे येत असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
राज्यातच नव्हे तर देशात सध्या गाजत असलेल्या नीट पेपर फुटी प्रकरणात लातूर कनेक्शन समोर आलेलं. देशात गदारोळ घातलेल्या नीट पेपरफुटीचे धागेदोरे थेट महाराष्ट्रात येऊन पोहोचले होते. या प्रकरणात जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक जलील पठाण आणि संजय जाधव इतर दोन अशा एकूण चार आरोपींची नावं समोर आली होती. जलील पठाणला काल पोलिसांनी अटक केली होती. आज कोर्टासमोर हजर केलं असता सात दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती. संजय जाधव या जिल्हापरिषदेच्या शिक्षकाचा शोध सुरू होता. पोलिसांनी संजय जाधवला अटक केली आहे. शिक्षक संजय जाधव याची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर लातूर येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये सध्या चौकशी सुरू आहे.
पेपरफुटी प्रकरणातील चार आरोपी नेमके कोण?
नीट पेपर फुटी प्रकरणात (NEET Exam Paper Leak Case) आतापर्यंत चार आरोपींचं कनेक्शन असल्याचं समोर आलं आहे. लातूर येथील संजय जाधव, जरील खान, उमरखान पठाण यांचा अजून एक साथीदार याच भागातील आहे. इरणणा कोनगलवार, असं या प्रकरणातील चौथ्या आरोपीचं नाव असून धाराशिवमधील उमरगा जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. या चारही आरोपींचा संपर्क दिल्ली येथील गंगाधर नावाच्या व्यक्तीसोबत असल्याचं समोर आलं आहे. म्हणजेच, नीट परीक्षेच्या पेपर्सच्या व्यवहारात दिल्लीतील व्यक्तीचा मोठा हात असल्याची माहिती समोर आली आहे.
पेपरफुटीचं रॅकेट नेमकं कसं काम करायचं?
नीट परीक्षांमधील घोटाळ्यानं देशभरातली अनेकांच्या भुवया उंचावल्याचं पाहायला मिळत आहे. जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असलेले संजय जाधव आणि उमरखान पठाण यांच्या मोबाईलमध्ये बारा विद्यार्थ्यांचे अँडमिट कार्ड सापडले आहेत.
यावरुन हे स्पष्ट होतं की, हे लोक या विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेऊन त्यांना परीक्षेपूर्वी पेपरची माहिती देत होते. त्यानंतर काही रक्कम स्वतःकडे ठेवून घेऊन उरलेली रक्कम दिल्ली येथील गंगाधर नावाच्या व्यक्तीला पाठवत होते. त्यांच्या बँकेत खात्यातून मोठ्या प्रमाणातली आर्थिक उलाढाल झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणातील महत्त्वाची बाब म्हणजे, उत्तरेकडील राज्यात झालेल्या पेपर फुटी प्रकरणातील आरोपींची बँक खाती पोलिसांनी तपासल्यानंतर लातूरची लिंक लागल्याची माहिती समोर आली आहे.