जामखेड न्युज——
पोलीस भरतीच्या एका पदासाठी तब्बल 101 अर्ज
राज्यात पोलीस भरती सुरू, एका पदासाठी तब्बल 101 अर्ज, पुरेशा सुविधांअभावी उमेदवारांची महाराष्ट्र राज्य पोलीस भरतीसाठी 17 हजार 471 रिक्त पदांकरिता संपूर्ण महाराष्ट्रात आजपासून मैदानी चाचणी परीक्षा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र पोलीस दलातील 17 हजार 471 पदांसाठी 17 लाख 76 हजार 256 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे एका पदासाठी 101 अर्ज आल्याची माहिती प्रशिक्षण आणि खास पथके विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक राजकुमार व्हटकर यांनी सांगितली आहे.
महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई पदाकरता रिक्त जागा 9 हजार 595 असून उमेदवारांनी दाखल केलेले अर्ज 8 लाख 22 हजार 984 इतके आहेत. तर चालक पदासाठी रिक्त जागा 1 हजार 686 असून एक लाख 98 हजार 300 अर्ज प्राप्त झालेले आहेत. बँड्समन पदाकरिता 41 जागा रिक्त असून 32 हजार 26 अर्ज आलेले आहेत. एसआरपीएफच्या 4 हजार 349 रिक्त पदांसाठी तीन लाख 50 हजार 552 उमेदवारांचा दाखल झाले असून तुरुंग शिपाई या पदाकरिता 1800 जागा रिक्त असून त्यासाठी तीन लाख 72 हजार 354 अर्ज प्राप्त झाले आहेत.
उमेदवारांची गैरसोय टाळण्यासाठी हा उपाय : शारीरिक चाचणी लेखी परीक्षा आणि मैदानी चाचणी या पद्धतीनं पोलीस भरती होणार असून ऑक्टोबर महिन्यामध्ये उमेदवारांची निवड पूर्ण होईल. त्यानंतर त्यांना प्रशिक्षणासाठी पाठवले जाईल. दोन पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची गैरसोय टाळण्याकरिता सर्व घटक प्रमुखांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार ज्या उमेदवारास एकाच वेळी दोन पदांकरिता मैदानी चाचणीस हजर राहण्यासाठी सूचना देण्यात आली असेल अशा उमेदवारांना पहिल्या ठिकाणी हजर राहिल्यानंतर दुसऱ्या ठिकाणची वेगळी तारीख देण्यात येणार आहे. दुसऱ्या ठिकाणावरील घटक प्रमुखांनी अशा उमेदवाराची मैदानी चाचणी घ्यावी. मैदानी चाचणीची पहिली तारीख आणि दुसऱ्या तारखेमध्ये चार दिवसांचं अंतर असावं; मात्र संबंधित उमेदवाराला पहिल्या मैदानी चाचणीला हजर राहिल्याचे पुरावे दुसऱ्या चाचणीच्या ठिकाणी घटक प्रमुखांना सादर करावे लागणार आहेत.
४४८ पोलीस शिपाई, ५८ चालक भरती : पुणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस शिपाई यांची ४४८ व चालक पोलीस शिपाई यांची ४८ रिक्त पदे भरण्यात येत आहे. पोलीस शिपाई चालक या पदासाठी मैदानी चाचणी परीक्षा दिनांक १९ जून ते २८ जून या कालावधीत घेण्यात येणार आहे. पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या आस्थापनेवर पोलीस शिपाई चालक या पदासाठी एकूण ५३१४ उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. तर पोलीस शिपाई पदासाठी एकूण ४२४०३ उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत.
टॉयलेट, बाथरूमची सुविधा नसल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय : छत्रपती संभाजीनगर येथे राज्यातील लाखो तरुण-तरुणी आस लावून बसलेल्या पोलीस भरती प्रक्रियेला अखेर आजपासून सुरुवात होणार असून आता राज्यातील पोलीस भरतीचे बिगुल वाजले आहे. राज्यातील एकूण 17,471 जागेंसाठी ही भरती होणार असून छत्रपती संभाजी नगरमध्ये 754 जागांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. यामध्ये शहर, ग्रामीण, रेल्वे आणि कारागृह शिपाई पदासाठी आजपासून मैदानी चाचणी सुरू होत आहे. 754 जागेसाठी तब्बल 97 हजार 835 उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून सरकारी नोकरीच्या आशेने उच्चशिक्षित तरुण देखील या भरतीत आपलं नशीब आजमावून पहात आहे. ही भरती प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी मैदानावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह स्वतंत्र कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण होणार असून जर पावसामुळे मैदानी चाचणी झाली नाही तर उमेदवारांना पुढची तारीख आणि वेळ दिला जाईल. त्यामुळे कोणीही भरती पासून वंचित राहणार नसल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलय; मात्र विद्यार्थ्यांना रात्रीची राहण्याची टॉयलेट, बाथरूमची सुविधा नसल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याचं समोर आलं आहे.
154 पोलीस शिपाईसह 59 चालक पदासाठी अर्ज :कोल्हापूर पोलीस दलातील 154 पोलीस शिपाई आणि 59 पोलीस चालक पदासाठी पोलीस मुख्यालय जवळील पोलीस परेड ग्राऊंड इथं दिनांक 19 ते 27 जून दरम्यान भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. पोलीस शिपाई पदासाठी 6 हजार 777 तर पोलीस चालक पदांसाठी 4 हजार 668 अशा 11 हजार 445 उमेदवारांनी अर्ज केलेतं. त्यामुळे ही भरती प्रक्रिया पारदर्शक आणि निप:क्षपातीपणे होणार असून यासाठी कोल्हापूर पोलीस दलाच्यावतीनं तयारी पूर्ण करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी दिलीय. दरम्यान या भरती प्रकियेत विद्यार्थ्यांच्या शारीरिक चाचणीसाठी आरएफआयडी या तंत्रज्ञानाचा पहिल्यांदाच वापर केला जाणार आहे. तसचं एकाच वेळी दोन ठिकाणी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना देखील चार दिवसांची मुदताढ देण्यात येणार असल्याचं महेंद्र पंडित यांनी म्हटलंय.
इतक्या उमेदवारांनी केले अर्ज : पोलीस भरती २०२२-२३ मधे ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त पदांकरिता अर्ज केले आहेत आणि त्यांची मैदानी चाचणी एकाच दिवशी आली असेल अशा उमेदवारांना किमान ०४ दिवस अंतराने वेगवेगळया तारखा दिल्या जातील. उमेदवारांना अडचण/शंका असल्यास त्यांनी raunak-saraf@mahait.org यावर ईमेल करावा. नागपूर जिल्हा ग्रामीण येथे पोलीस भरती २०२२-२३ मध्ये एकूण १२९ पदाकरिता १४२७४ अर्ज प्राप्त झाले असून त्यामध्ये पुरूष उमेदवाराचे १०३९४ अर्ज व महिला उमेदवाराचे ३८८० अर्ज प्राप्त झाले आहेत. नाशिक जिल्ह्यातील 118 पदांसाठी एकूण आठ हजार 325 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.