जामखेड न्युज——
नगर जिल्ह्यात दोन ग्रामसेवक निलंबित,
निलंबित कालावधीत एक ग्रामसेवक अकोले येथे तर एक जामखेड येथे राहणार
श्रीरामपूर-तालुक्यातील बेलापूर बुद्रुकचे तत्कालीन ग्रामसेवक राजेश तगरे व विद्यमान ग्रामसेवक मेघश्याम गायकवाड यांना निलंबीत करण्यात आले आहे. जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी त्यांच्या निलंबनाचे आदेश काढल्याने तालुक्यातील ग्रामसेवकांमध्ये खळबळ उडाली आहे.
बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक राजेश एकनाथ तगरे हे बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायतमध्ये कार्यरत असताना ग्रामंपचायत कार्यालयीन कामकाजात हलगर्जीपणा व कर्तव्यात कसूर केला. तसेच ग्रामपंचायतीस प्राप्त निधीचा कायमस्वरुपी व संशयित अपहार केल्याचे तसेच तगरे हे कामावर असताना कार्यालयीन कामामध्ये त्यांनी गैरवर्तन केले असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
तर मेघश्याम गायकवाड यांच्यावरही कार्यालयीन कामकाजात हलगर्जीपणा व कर्तव्यात कसूर केला. तसेच ग्रामपंचायतीस प्राप्त निधीचा कायमस्वरुपी व संशयित अपहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यांच्या केलेल्या चौकशीमध्ये वरील बाब निदर्शनास आलेली आहे.
त्यामुळे श्री. तगरे व गायकवाड यांनी महाराष्ट्र जि.प. सेवा (वर्तणूक) नियम 1967 च्या नियम 3 चा भंग केलेला आहे. त्यांच्याविरुध्द शिस्तविषयक कार्यवाही अनिर्णित असल्याने त्यांना सदरचा आदेश बजावल्याच्या दिनांकापासून जिल्हा परिषद सेवेतून ग्रामसेवक या पदावरुन निलंबित करण्यात आले आहे.
तसेच आदेश अंमलात राहील तेवढ्या कालावधीत राजेश तगरे यांचे मुख्यालय पंचायत समिती अकोले, तर मेघश्याम गायकवाड यांचे मुख्यालय पंचायत समिती, जामखेड राहणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी काढलेल्या आदेशात म्हंटले आहे.