जामखेड न्युज——
सावधान!!! फटाके वाजवताना काळजी घ्या
नगर जामखेड रस्त्यावर फटाक्यांच्या ठिणगीने नवीकोरी कार जळून खाक

सध्या उन्हाचा कडाका भयंकर आहे. लग्नसराई सुरू आहे. लग्नात मोठ्या प्रमाणात फटाके वाजवले जातात यामुळे फटाक्यांच्या ठिणग्या उडून अनेक ठिकाणी आगी लागतात. अनेक जण जखमी होतात. यामुळे फटाके वाजवताना काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

दोन दिवसांपूर्वी नगर-जामखेड रोडवरील सांडवा फाटा येथे लग्न सोहळ्यात फटाके वाजवताना ठिणगी उडून जवळच उभा केलेल्या कारने पेट घेतला. काही क्षणातच ही कार जळून खाक झाली.बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सांडवा फाटा येथे समाधान लॉन्सवर लग्न सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मंगलअष्टक पूर्ण झाल्यानंतर मंडपापासून काही अंतरावर नातेवाईकांनी फटाक्यांची मोठी आतषबाजी केली. फटक्यांमधून उडालेल्या ठिणग्या परिसरातील वाळलेल्या गवतावर पडल्याने गवताने पेट घेतला.

गवत पेटल्याची बाब निदर्शनास येण्याआधीच आगीचा हा भडका थेट जवळच उभा केलेल्या कारजवळ जाऊन पोहोचला आणि कारने पेट घेतला. उपस्थितांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र, उन्हाच्या तीव्रतेने आगीने आणखी भडका घेतला आणि काही मिनिटातच ही संपूर्ण कार जळून खाक झाली.

दरम्यान या कारजवळ आणखी काही वाहने उभा करण्यात आले होते. मात्र आग लागल्याचे निदर्शनास येतात तेथील वाहने तत्काळ काढून घेण्यात आली. अन्यथा अनेक वाहने आगीच्या भक्षस्थानी पडले असते.





