जामखेड न्युज – – –
नवीन शैक्षणिक वर्षाला 15 जून रोजी सुरवात झाली असली तरी, शासनाकडून विद्यार्थ्यांना अद्यापही पाठ्यपुस्तके उपलब्ध झालेली नाहीत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी झाडाखाली, काही ठिकाणी पारावर तर काही ठिकाणी ऑनलाइन शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र, पुस्तकांअभावी विद्यार्थी तसेच शिक्षकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
कोरोना संसर्गामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्यात आले तर दहावी व बारावीच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या होत्या. 2021-22 या शैक्षणिक वर्षाची सुरवात झाली असली तरी अद्यापही पाठ्यपुस्तके आलेली नाहीत. तर समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत दिली जाणारी पाठ्यपुस्तकेही अद्यापपर्यंत उपलब्ध झालेली नाहीत. त्यामुळे गैरसोयीत भरच पडत आहे. काही ठिकाणी विद्यार्थ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी मागील वर्षाच्या मुलांकडून चांगली पुस्तके पुन्हा शाळेत जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परंतु पुन्हा वापरासाठी ही पुस्तके प्रत्येक विद्यार्थ्याला देणे अवघड व कठीण आहे. कारण, लहान विद्यार्थ्यांची पुस्तके ही खराब झालेली असतात. विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तके नसल्याने शिक्षकांनाही अध्यापन व अध्यापनाचे काम करणे अवघड जात आहे. त्यामुळे शासनाने त्वरित पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करावा, अशी मागणी पालक, विद्यार्थी व शिक्षक वर्गातून केली जात आहे.
“चार आण्याची कोंबडी व बारा आण्याचा मसाला”
सध्या शालेय पोषण आहारासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांचे खाते राष्ट्रीयकृत बँकेत हवे म्हणून खाते नंबर गोळा करण्यासाठी शिक्षकांची धावपळ सुरू आहे अनेक विद्यार्थ्यांचे खाते नाही खाते उघडण्यासाठी सध्या पालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. झिरो बॅलन्स वर खाते उघडण्यासाठी आॅनलाईन वाले तीनशे रुपये घेतात आणी खात्यात उन्हाळ्यातील पोषण आहाराचे दिडशे रूपयांच्या आसपास पैसे जमा होणार आहे. म्हणजे चार आण्याची कोंबडी व बारा आण्याचा मसाला अशी गत झाली आहे. त्यामुळे पालकांच्या खात्यावर पैसे जमा करावेत अशी माहिती पालक व शिक्षक वर्गातून पुढे येत आहे.
कोरोना महामारीच्या संकटामुळे पुस्तके छपाईला विलंब झाला असला तरी मागील वर्षाच्या विद्यार्थ्यांकडून चांगल्या स्थितीतील पुस्तके परत घेऊन त्याचा पुन्हा वापर करण्यात येत आहे. 1 जुलै ते 15 ऑगस्टपर्यंत 45 दिवसांचा सेतू अभ्यासक्रम (Bridge course) उपक्रम सुरू असून या उपक्रमांतर्गत मागील वर्षाच्या क्षमता आणि चालू वर्षाची पूर्वतयारी याचा अभ्यास घेतला जात आहे. यामुळे 15 ऑगस्टपर्यंत तरी चालू वर्षाच्या इयत्तांच्या पुस्तकांची गरज विद्यार्थ्यांना असणार नाही. 15 ऑगस्टपर्यंत पुस्तकांची छपाई होऊन सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या इयत्तेची पुस्तके मिळतील अशी आशा आहे. केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांनी व्यक्त केली आहे.