जामखेड न्युज – – –
हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वीरभद्र सिंह यांचे गुरुवारी पहाटे निधन झाले. शिमलाच्या इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमध्ये वीरभद्र सिंह यांनी अखेरचा श्वास घेतला.
गेल्या तीन महिन्यांत दोन वेळा कोविड १९ मधून वीरभद्र सिंह यांची सुखरूप सुटका झाली होती. मात्र, त्यानंतर तब्येत खालावल्याने २३ एप्रिलपासून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि राज्याचे सद्य मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनीही वीरभद्र सिंह यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती.
पहिल्यांदा कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांना चंदीगढच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोविड संक्रमणातून बाहेर पडल्यानंतर ते ३० एप्रिल रोजी घरी परतले होते. परंतु, घरी पोहोचल्यानंतर पुन्हा श्वासोच्छवासात अडथळे जाणवल्यानंतर त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ८७ वर्षीय वीरभद्र सिंह यांनी तब्बल सहा वेळा हिमाचलचे मुख्यमंत्रीपद भूषवलं, तर तब्बल नऊ वेळा आमदार आणि पाच वेळा ते खासदार बनण्याचा अनोखा रेकॉर्ड त्यांनी कायम केला. सध्या ते सोलान जिल्ह्यातील अर्की मतदारसंघाचे आमदार होते.
वीरभद्र सिंह यांनी याच वर्षी जानेवारी महिन्यात सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले होते. पुढची निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी म्हटले होते. यावेळी, ‘मी निवडणूक लढणार नाही परंतु, मी काँग्रेसी होतो आणि मरेपर्यंत काँग्रेसीच राहीन’, असे वक्तव्य वीरभद्र सिंह यांनी केले होते. काँग्रेसच्या भरभक्कम शिलेदारांपैंकी एक म्हणून वीरभद्र सिंह ओळखले जात होते.