देवेंद्र फडणवीस यांचा जरांगे पाटलांना मध्यरात्री तीन वाजता फोन, जरांगे पाटलांचा गौप्यस्फोट

0
1012

जामखेड न्युज——

देवेंद्र फडणवीस यांचा जरांगे पाटलांना मध्यरात्री तीन वाजता फोन

जरांगे पाटलांचा गौप्यस्फोट

मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन अजूनही सुरूच आहे. सकल मराठा समाजाकडून परभणीत बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत 24 तारखेला अंतरवली सराटी येथे सभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्येक गावातून दोन मराठा बांधवांनी सभेला जाण्याचा निर्णय घेण्यात आला. या सभेत मनोज जरांगे पाटील लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जो निर्णय घेतील त्याला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जरांगे यांना देवेंद्र फडणवीस यांचा मध्यरात्री 3 वाजता फोन आला असा मोठा गौप्यस्फोट करण्यात आला आहे.


मराठा आरक्षणाची मागणी लावून धरणारे मनोज जरांगे पाटील यांनी एक नवा गौप्यस्फोट केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला मध्यरात्री 3 वाजता फोन केला होता, असा गौप्यस्फोट मनोज जरांगे यांनी केला आहे. फडणवीस यांचा आधी रात्री एक वाजता फोन आला. पण तो मी घेतला नाही. त्यांच्या कार्यकर्त्यांनी फार आग्रह धरला, त्यामुळे रात्री 3 वाजता फडणवीस यांचा फोन घेतला. त्यांच्याशी चर्चा झाली, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.


मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या संभाषणाची सविस्तर माहिती दिली. फडणवीस यांनी मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेत असल्याचं म्हटलंय. तसेच फडणवीस यांचा मला फोन आला होता. गुन्हे मागे घेत असल्याबद्दल त्यांनी सांगितलं. फडणवीस माझ्याशी बोलले. आपण काही पोटात ठेवत नसतो. फडणवीस यांनी रात्री 3 वाजता फोन केला होता, असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

म्हणून फोन घेतला

मी रात्री 1 वाजता फडणवीस यांचा फोन घेतला नाही. त्यांनंतर त्यांचे कार्यकर्ते माझ्याकडे आले. त्यांना म्हटलं फडणवीस आणि माझं जुळणार नाही. पण फडणवीस यांचे कार्यकर्ते म्हणाले, नाही… नाही, फोन घ्यावाच लागेल. त्यांचे लोकं येऊन बसले होते. पुढं असं काही होणार नाही. बीडचा एसपी बोलतोय. नांदेड आणि जालन्याच्या एसपीला खूप त्रास दिलाय. मुलांना खूप त्रास झालाय. आता नाही होणार असं, असं त्यांच्या लोकांनी सांगितलं. त्यामुळे मी फडणवीस यांचा फोन घेतला, अशी माहितीही त्यांनी दिली.

24 तारखेला काहीही होईल

मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. पण कारवाया सुरूच आहेत. याचा अर्थ इकडून गोड बोलायचं आणि दुसरीकडून मराठा द्वेष दाखवायचा असंच दिसतंय. आमच्या लोकांनी मला मराठ्यांवर गुन्हे दाखल करणं सुरू असल्याचं दाखवलं. एकीकडून सांगायचं आता काही होणार नाही, असं करायचं, तसं करायचं. पण मी मात्र समाजाची भूमिका घेऊन जाईल. 24 तारखेला काहीही होईल, असा इशाराच त्यांनी दिला.

आज सभा

दरम्यान, करमाळा तालुक्यातील दिवेगव्हाण येथे मनोज जरांगे यांची बुधवारी 23 तारखेला दुपारी 4 वाजता सभा होणार आहे. ग्रामस्थ दिवेगव्हाण आणि सकल मराठा समाज करमाळा यांच्यावतीने या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून जास्तीत जास्त समाज बांधवांनी या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here