जामखेड न्युज——
शिवजयंतीनिमित्त आयोजित महावक्ता वक्तृत्व स्पर्धेत लहान गटात सृष्टी नेटके तर मोठ्या गटात शिवगंगा मत्रे यांनी मिळविला प्रथम क्रमांक
जामखेड तालुका सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने आयोजित केलेल्या महाराष्ट्राचा महावक्ता या राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेच्या लहान गटात सृष्टी नेटके तर मोठ्या गटात शिवगंगा मत्रे यांनी प्रथम क्रमांक मिळविला आहे.
जामखेड तालुका सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने आयोजित केलेल्या महाराष्ट्राचा महावक्ता या राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेचा उद्घाटन सोहळा नगर रोड, जामखेड येथील साई गार्डन येथे मुस्लिम पंच कमिटीचे अजहर काझी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पार पाडला. याप्रसंगी प्रा.मधुकर राळेभात, अवधूत पवार, शहाजी राळेभात, डॉक्टर प्रशांत गायकवाड, विकास राळेभात, प्रा.राम निकम, प्रशांत राळेभात, दत्तात्रय सोले पाटील, वसीम सय्यद, विनायक राऊत, तात्याराम बांदल, डॉक्टर कैलास हजारे, महेश यादव यांच्यासह मोठ्या संख्येने आलेले स्पर्धक व शिवप्रेमी उपस्थित होते.
यावेळी बोलताना अझहर काझी म्हणाले की, शिवजयंती उत्सव समितीने जामखेड तालुक्यातील मुस्लिम समाजाला या जयंती उत्सवात सहभागी करून घेतले ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. यापुढेही होणाऱ्या सर्व कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तब्बल सात तास चाललेल्या या स्पर्धेत 100 पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. सदर स्पर्धेत लहान गटात सृष्टी नेटके (प्रथम), सम्राट घोडेस्वार (द्वितीय), अदित्य लबडे, /प्रिती कोकरे, (तृतीय विभागून), प्रोत्साहनपर शिवम उंडे व प्राची कदम यांनी बक्षिसे पटकावली. तर मोठ्या गटात प्रथम शिवगंगा मत्रे (७००१ रूपये, सन्मान चिन्ह), द्वितीय प्रविणकुमार नागरे (५००१ रूपये,सन्मान चिन्ह), तृतीय विद्या घायतडक (३००१ रूपये, सन्मान चिन्ह),चौथे उत्कर्षां निकम (२००१ रूपये सन्मान चिन्ह),पाचवे धिरज खेडकर (५०१ रूपये,सन्मान चिन्ह ), सहावे वैष्णवी जरे (५०१ रूपये, सन्मान चिन्ह ) यांनी बक्षीस पटकावली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे बक्षीस वितरण पार पडले.
स्पर्धा यशस्वी होण्यासाठी नवनाथ बहिर, रजनीकांत साखरे, केशव कोल्हे, जितेंद्र आढाव, राजु मडके, संदीप लबडे यांनी परिश्रम घेतले. परिक्षक म्हणून शिवव्याख्याते अफसर शेख, जाकीर शेख सर यांनी तर सूत्रसंचालन हनुमंत निकम व आभार विनायक राऊत यांनी मानले.