जामखेड न्युज ——
तहसीलवर गाढवांचा मोर्चा आणणारे, उपोषणाच्या मार्गाने जनतेला न्याय देणारे, जनसंघाचे सच्चे कार्यकर्ते कांता पाटील काळाच्या पडद्याआड
जनसंघाचा सच्चा कार्यकर्ता, अटलबिहारी वाजपेयी यांच्या बरोबर पायी तालुका फिरणारे गोरगरीब जनता भटक्या विमुक्त जाती जमाती यांच्या न्याय हक्कांसाठी उपोषणाच्या मार्गाने प्रशासनाला जागे करणारे, भटक्या समाजाला राहण्याच्या जागेसाठी तहसील वर गाढवांचा मोर्चा काढणारे, गोरगरिबांच्या हाताला काम देणारे, चळवळीतील कार्यकर्ते कांता पाटील यांच्या नुकतेच जामखेड तालुक्यातील बोर्ला या गावी निधन झाले याबद्दल त्यांच्या कार्याला उजाळा देणारा लेख
लक्ष्मीकांत आनंदराव काकडे उर्फ कांता पाटील हे नाव सर्व जामखेड तालुक्याला परिचित असणारे नाव कुठलीही राजकीय पार्श्भूमी नसताना सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून येऊन जिल्ह्यात असामान्य कर्तृत्व करणारे बोरले गावचे भूषण, ज्येष्ठ नेते, समाजसेवक व स्वातंत्र्य सेनानी लक्ष्मीकांत आनंदराव काकडे उर्फ कांता पाटिल यांचं नुकतेच त्यांच्या मुळ गावी बोरले येथे वृद्धापकाळाने निधन झाले.
उत्तम स्पष्ट वक्ता, सामाजिक भान व प्रशासन व कायद्याचा गाढा अभ्यास असल्यामुळे तालुक्यातील प्रशासनावर त्यांची मजबूत पकड होती. यामध्यामातून गोरगरीब जनतेसाठी मोठ्या प्रमाणात भरीव कार्य त्यांनी केले. यामध्ये प्रामुख्याने जनतेसाठी केलेली कित्येक अमरण उपोषणे, आंदोलने, मोर्चे, धडक मोर्चे, आजही अजरामर आहेत. मुख्यतः भटक्या विमुक्त जातिंकरता त्यांचे विशेष कार्य आहे.
यामध्ये विविध भटक्या जाती जसे- कैकाडी, तिरमाली, वैदू, पारधी, नंदिवले असल्यामुळे यांना जामखेड तालुक्यामध्ये राहण्यासाठी स्वतःची जागा नव्हती यांच्यासाठी कांता पाटलांनी जामखेड तहसील कार्यालयावरती ‘गाढवाचा मोर्चा ‘ धडकवला होता, त्यामुळे त्यांना राहण्यासाठी स्वतः ची जागा आरोळे वस्ती येथे मिळाली.
या भटक्या जमाती स्थिर तर झाल्या परतू रोजगाराचा प्रश्न ही होता त्यासाठी पाटलांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन रत्नापुर येथील काझीवाडी तलावाचे मशीनने होणारे काम थांबवून ते मनुष्यबलाच्या माध्यमातून राबवले. यातूनच या भटक्या जातींना रोजगार मिळाला व ते तालुक्यात स्थिरस्थावर झाले.
सर्वसामान्यांसाठी झटत असल्यामुळे व जनसंघाचे नेते म्हणून काम करत असल्यामुळे 1975 मध्ये इंदिरा गांधी सरकारने लावलेल्या देशांतर्गत आणीबाणी मिसा कायद्याअंतर्गत कांता पाटलांना स्वतः च्या संसारावर व कुटुंबाला वाऱ्यावर सोडून 18 महिने तुरुंगवास भोगावा लागला.
तालुक्यातील अनाथ मुलांसाठी जामखेड तालुक्यातील पहिली अनाथ मुलांची शाळा सुरू केली, तसेच बाहेरगावाहून मॅट्रिक परीक्षेसाठी जामखेड ला येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजनकेंद्र चालवले, याचा त्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला.
सर्वसामान्य शेतकरी कुटंबातून येत असूनही त्यांना राजकारणाची आवड होती. जनसंघाची पाळेमुळे रोवण्याचे काम त्यांनी केले. उत्तम वक्ता असल्यामुळे रस्त्यावरती ही पाटिल बोलायला लागले तर सभा सुरू व्हायची व लोक जमत असत. त्यामुळे तालुक्यात होणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद व मार्केट कमिटी या निवडणुका त्यांनी लढवल्या तसेच एकदा त्यांनी खासदारकीची निवडणूक ही लढवली यामध्ये जिल्ह्यामधून त्यांना पाचव्या क्रमांकाचे मताधिक्य मिळाले. त्यांनी गोरगरीब जनता व भटक्या विमुक्त समाजासाठी केलेले समाजकार्य उल्लेखनीय आहे.
तालुक्यातील त्या काळचे जनसंघाचे मोठे नेते म्हणूनही त्यांचे नाव घेतले जाते. यामध्ये भारताचे पंतप्रधान अटबिहारी वाजपेयींचा जामखेड दौरा महत्वाचा आहे. यामध्ये त्यांनी पायी फिरून पूर्ण जामखेड तालुका त्यांना दाखवला. याची बातमी काही वृत्तपत्रांनी अटलजींच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध केली होती.
त्यांचं व्यक्तिमत्त्व अष्टपैलू होत -स्पष्ट वक्ता, झुंझार नेता, कवी, समाजसेवक व राजकारणी.. व राज्यसरकारने त्यांना 2019 साली स्वातंत्र्य सेनानी चा दर्जा बहाल केला होता.
जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी सत्याग्रह व उपोषणाच्या मार्गाने सरकारला धारेवर धरणे याची त्यांना हातोठी होती. तालुक्यातील प्रत्येक ग्रामीण भागातील गावाची इत्यंभूत माहिती असणारा, प्रत्येक गावात पायी फिरून जनसंघाच काम करणारा, गोरगरिबांसाठी, पद दलितांसाठी लढवय्या झुंझार नेता पुन्हा होणे नाही.गोरगरिबांचे कैवारी, तळागाळातील समाजासाठी झटणारे तळमळीचे समाजसेवक यांच्या दुःखद निधनाची बातमी मनाला वेदना देणारी आहे.
लेख संकलन भुषण काकडे (कांता पाटील यांचे नातू)