जामखेड न्युज——-
अहमदनगर व जळगाव जिल्ह्यातील शिक्षकांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेत करावेत यासाठी शिक्षक आमदार किशोर दराडे विधानपरिषदेत आक्रमक
अहमदनगर व जळगाव जिल्ह्यातील शिक्षकांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेत करावेत यासाठी शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी विधानपरिषदेत आक्रमक भूमिका मांडली.
आमदार किशोर दराडे नगर जिल्ह्यात दौऱ्यावर असताना अनेक शिक्षकांनी आपापल्या प्रलंबित मागण्या केल्या होत्या. यात सर्वात महत्वाची मागणी म्हणजे नगर जिल्ह्यातील शिक्षकांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेत करावेत अशी मागणी केली होती.
नगर जिल्ह्यातील शिक्षकांचे पगार आगोदर राष्ट्रीयकृत बँकेत होते पण जिल्ह्यातील सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने काही महिन्यांपूर्वी जिल्ह्यातील शिक्षकांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेतून जिल्हा सहकारी बँकेत वर्ग केले होते. याबद्दल शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष आहे. हिच शिक्षकांची मागणी आमदार किशोर दराडे यांनी विधानपरिषदेत आक्रमक पणे मांडली.
उत्तर महाराष्ट्रातील जळगाव व अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षेत्तर कर्मचारी यांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेत करावेत व तत्काळ त्याचा शासन निर्णय निर्गमित करावा अशी मागणी लोकप्रिय शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी आज विधान परिषदेच्या सभागृहात केली.
या दोन्ही जिल्ह्यातील शिक्षकांचे पगार सद्या जिल्हा बँकेत होतात.परंतु जिल्हा बँक शिक्षकांना कोणत्याही सुविधा देत नाही अथवा विमाही काढत नाही.याउलट राष्ट्रीयकृत बँक शिक्षकांचा विमा काढून इतर अनेक सोयी-सुविधांचा लाभ देतात…काही अपघात-आपत्ती झाल्यास २५ ते ५० लाख रुपयांपर्यंत राष्ट्रीयकृत बँका त्यांना विमा भरपाई देतात.
राष्ट्रियकृत बँका होम लोन, वाहन लोन कमी व्याजदरात देतात… तसेच एटीएम च्या माध्यमातून हवे तेथे पैसेही काढण्याची सुविधा मिळते. जिल्हा बँकेत शिक्षकांना त्यांच्या हक्काचे पैसे काढण्यासाठी अनेक चकरा मारायला लागतात.
विविध ऑनलाइन सुविधा,एटीएम कार्ड सुविधा जिल्हा बँकेत उपलब्ध नाही. त्यामुळे मी जळगाव व अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षकांचे पगार राष्ट्रकृत बँकेत होण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करावा यासाठी मी हा विशेष उल्लेख करत असल्याची मागणी आमदार दराडे यांनी सभागृहात करून शासनाचे लक्ष वेधले.