जामखेड न्युज——
ऋषिपंचमीनिमित्त बांधखडक जिल्हा परिषद शाळेचा अनोखा उपक्रम
प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मुलांना अधिकारी बनविणा-या माता-पित्यांचे पूजन व मुलाखत
भारतीय संस्कृतीतील प्रत्येक सण व उत्सव हे मूल्याधिष्ठीत असून त्यातील भाद्रपद महिन्यात येणा-या श्रीगणेशोत्सवातील ‘ऋषिपंचमी’ हा पवित्र दिवस ज्येष्ठांचा व श्रेष्ठांचा आदर व सन्मान करण्याचा संदेश देतो. याच दिवसाचे औचित्य साधून बुधवार दि.20 सप्टेंबर 2023 रोजी तालुक्यातील बांधखडक येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपल्या पाल्यांना उच्चपदस्थ अधिकारी बनविणा-या तालुक्यातील तीन ऋषितुल्य दांपत्यांचा सत्कार,पूजन व प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
जवळा येथील पीएसआय बनलेले राहुल वाळुंजकर यांचे माता-पिता सौ.अलका व श्री.उत्तमराव वाळुंजकर, साकत येथील सहायक विक्रीकर अधिकारी पदी निवड झालेले श्रीकृष्ण वराट यांचे माता-पिता सौ.अलका व श्री.हनुमंत वराट आणि खर्ड्याजवळील नागोबाची वाडी येथील नुकतीच पीएसआय पदी निवड झालेले श्री.भाऊसाहेब गोपाळघरे यांचे माता-पिता सौ.मंगल व श्री.बलभिम गोपाळघरे या तीन दांपत्यांचा सत्कार, पूजन व मुलाखतीचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात संपन्न झाला.
श्री.उत्तम वाळुंजकर हे छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय जवळा येथे आणि श्री.हनुमंत वराट हे ल.ना.होशिंग विद्यालय जामखेड येथे शिपाई म्हणून कार्यरत आहेत, तर श्री.बलभिम गोपाळघरे हे स्वत: दिव्यांग असून मुलांच्या शिक्षणासाठी अनेक वर्षे मजुरी व ऊसतोडण्याचे काम करत आहेत. विद्यार्थ्यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीतून या तीनही दांपत्याने आपल्या जीवनातील हा एक सर्वोच्च आनंदाचा दिवस असून विद्यार्थ्यांनी जिद्दीने अभ्यास करून यशस्वी बनावे व ज्येष्ठांचा सन्मान करावा असे आवाहन केले. शेवटी पी.एस.आय.भाऊसाहेब गोपाळघरे यांनी बांधखडक शाळेतील सर्व उपक्रम हे नाविन्यपूर्ण ,प्रेरणादायी व मूल्याधिष्ठीत असून माझ्या आई-वडिलांचा आज ‘न भूतो न भविष्यति’ असा सन्मान केल्याबद्दल शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त केली व विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले.
प्रास्ताविकातून उपक्रमाचा उद्देश आदर्श शिक्षक श्री.मनोहर इनामदार यांनी सविस्तरपणे व्यक्त केला,तर आभार प्रदर्शन बांधखडक शाळेचे मुख्याध्यापक श्री.विकास सौने यांनी केले.
विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तेसह संस्कार,सेवाभाव व जिद्द निर्माण होणा-या विविध प्रेरणादायी सहशालेय उपक्रमांचे शाळेतर्फे सातत्याने आयोजन केले जात असल्याबद्दल बांधखडकच्या सर्व पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.