जामखेड प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी तीस लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे. हे बक्षीस म्हणजे त्यांनी लोकांना दिलेले प्रलोभन असून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणारे आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी,’ अशी मागणी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी केली. ‘अशा पद्धतीने दमबाजी करत जर निवडणूक बिनविरोध करण्याची प्रथा पडली तर भविष्यात टाटा, बिर्ला आमदार-खासदार होतील,’ असा टोलाही त्यांनी पवार यांना लगावला. ते नगरमध्ये बोलत होते.
ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करणाऱ्या गावात तीस लाखांचा निधी देण्याची घोषणा आमदार रोहित पवार यांनी केली आहे. मात्र आता त्यावरून चांगलेच राजकारण पेटले असून माजी मंत्री शिंदे यांनी तर थेट रोहित पवार यांच्या सह ज्या ज्या आमदारांनी बिनविरोध निवडणूकीसाठी बक्षिसे ठेवलेली आहेत यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई करण्याची मागणी केली आहे. शिंदे म्हणाले, ‘राज्य निवडणूक आयोगाची एक आचारसंहिता ठरली आहे. निवडणुकीत प्रलोभने दाखवणे, लोकांवर दबाव तंत्र वापरणे, पैशाचा वापर करणे, हे गैर आहे. एखाद्या आमदारांनी विकासाला चालना दिली पाहिजे. विकास केला पाहिजे. याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्यास देखील दुमत नाही. मात्र, ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आमदार हे घटनाविरोधी बोलतात, आचारसंहितेचे उल्लंघन करत आहेत. रोहित पवार यांनी जे तीस लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे, ते लोकांना प्रलोभने देणारे आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने याची सखोल चौकशी करावी. तसेच काही ठिकाणी सरपंच पदासाठी बोली लागलेली आहे. अशा ग्रामपंचायतीची सखोल चौकशी करावी तसेच
ग्रामपंचायत निवडणूक दबाव आणून ते बिनविरोध करत असतील तर ते देश हुकूमशाहीला नेण्याचे चित्र निर्माण करत आहे.
रोहित पवारांवर कारवाई करा- राम शिंदे
‘आज ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी ते पैसे देतात, उद्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका, खासदार, आमदार यांच्या निवडणुका अशाच बिनविरोध होतील व त्यामुळे टाटा, बिर्ला हेच लोक आमदार-खासदार होतील, असा टोलाही त्यांनी पवार यांना लगावला. तरी राज्य निवडणूक आयोगाने सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यावर गुन्हे दाखल करावेत. त्यासाठी आवश्यक असेल तर समिती गठित करावी,’ अशी मागणीही शिंदे यांनी केली आहे. यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
राम शिंदे यांच्या टिकेला आमदार रोहित पवार काय उत्तर देणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.