भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. भारतीयांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. चांद्रयान 3 यशस्वीरित्या चंद्रावर लँडिंग झालं आहे. यासह भारताने इतिहास रचला आहे. दक्षिण ध्रुवावर सेफ लँडिंग करणारा भारत पहिलाच देश ठरला आहे. तसेच भारत अमेरिका, रशिया आणि चीननंतर चंद्रावर सेफ लँडिग करणारा चौथा देश ठरला आहे. भारताच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर इस्त्रोच्या शास्त्रज्ञांच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही इस्त्रोच्या टीमचं अभिनंदन केलं. तसेच शास्त्रज्ञांच सर्वच स्तरातून आणि क्षेत्रातून कौतुक केलं जात आहे.
शास्त्रज्ञांच्या मेहनतीला यश
भारताची ही मोहिम यशस्वी व्हावी,यासाठी गेल्या 24 तासांपासून देशभरातील विविध ठिकाणी होमहवन करण्यात आले. तसेच ठिकठिकाणी प्रार्थना करण्यात आल्या. अखेर प्रत्येक भारतीयाच्या प्रार्थनेला आणि शास्त्रज्ञांच्या मेहनतीला यश आलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं ट्विट
प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असा हा आजचा क्षण आहे
बुद्धिवंतांचा देश अशी ओळख असलेल्या आपल्या भारताने आज हे देदिप्यमान, ऐतिहासिक यश मिळवलं आहे…
‘चंद्रयान ३’ मोहिमेमधील विक्रम लॅन्डर चंद्रावर उतरले आणि या मोहिमेतील सर्वांत महत्त्वाचा टप्पा आज पार पडला…