जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
कर्जत तालुक्यातील गोयकरवाडी इथल्या कोविड सेंटरमध्ये आमदार रोहित पवार यांनी कोरोना रुग्णांसोबत झिंगाट गाण्यावर ठेका धरला. त्यांच्या डान्सचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.त्यामुळे भाजपला मिरच्या लागल्या आहेत. लगेच विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी कोरोना रुग्णांसोबतच्या डान्सवरून रोहित पवार यांना नियमांची आठव ण दिली. पवार यांनी एका कोविड सेंटरवर जाऊन कोविड प्रोटोकॉलचा भंग केला, तो निषेधार्ह आहे. कोणतेही पीपीई किट न घालता ते गेले, त्यामुळे ते सुपर स्प्रेडर ठरू शकतात, असे दरेकरांनी म्हटले आहे.
पवारांचे नातू म्हणून वेगळा न्याय का, असा सवालही त्यांनी केला.त्यावर पवार यांनी लगेच उत्तरही दिले. त्यावर पुन्हा दरेकरांनी उत्तर दिले. दोघांच्या या सवाल-जबाबाच्या ‘टिवटिवी’मुळे सर्वांची चांगली करमणूक होत आहे. दरेकर यांनी ट्विट केल्यानंतर पवार यांनीही त्यांना ट्विट करून उत्तर दिले आहे. त्यात त्यांनी, “सन्माननीय प्रवीण दरेकर साहेब कोविड सेंटरमधली माणसे माझ्या कुटुंबातली असून, त्यांच्यासाठी कितीही केले तरी ते कमी आहे. त्यामुळे शक्य ते सगळे करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो. अगदी पहिल्या दिवसापासून मी त्यांची काळजी घेतो. त्यांना काल एकच दिवस भेटलो, असे नाही, तर नेहमीच भेटतो. माझ्या मतदारसंघातले अधिकारी आणि नागरिकही या रुग्णांची जमेल तशी सेवा करतात. कोविडमुळे खचलेल्या रुग्णांना माझ्या भेटीमुळे धीर येत असेल, त्यांच्या आनंदात दोन मिनिटे सहभागी झाल्याने तो द्विगुणित होत असेल, तर त्यात गैर काय? त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हाच माझ्यासाठी आनंद आहे,” असे उत्तर दिले.
त्याचबरोबर “पाचवी नापास झालेल्या गुजरातमधल्या एका आमदारासारखे मी रुग्णाला इंजेक्शन दिले नाही. तसेच आपल्याही पक्षाचे अनेक नेते पीपीई किटशिवाय रुग्णांना भेटले, तेव्हा त्यांच्या निदर्शनास आपण ही गोष्ट आणून दिल्याचेही काही दिसले नाही ! असे का?”, असा सवालही पवार यांनी दरेकरांना विचारला. त्यानंतर पवार यांच्या ट्विटला लगेच दरेकर यांनी उत्तर दिले आहे. त्यात, “रोहित पवारजी, मतदारसंघातील सर्वांना कुटुंब समजून आपण त्यांची सेवा करता, हे उत्तमच! त्याविषयी आक्षेप किंवा शंका नाही. पण राज्यातील सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी रुग्णांची जमेल तशी सेवा करीत आहेतच. रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण होणे, ही तुमच्या माझ्यासारख्यांसाठी आनंदाची पर्वणीच ठरेल. पाचवी नापास झालेल्या गुजरातमधील आमदारांसारखे आपण इंजेक्शन दिले नसेलही, पण कोविड नियमांचे केलेले उल्लंघन ही त्याच तोडीची गंभीर बाब आहे,” असे त्यांनी सुनावले.
“नियम उल्लंघनाबाबत आमच्या पक्षातील असो व अन्य, मी त्या त्यावेळी माझी भूमिका मांडली, समर्थन केले नाही. गुजरातमधील आमदारांकडे बोट करताना अनेक मंत्री खुलेआम प्रोटोकॉलचे उल्लंघन करत होते, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवीत होते, लग्न समारंभांना उपस्थित रहात होते, दस्तुरखुद्द बारामतीत पाणी भरून इंजेक्शन विकली जात होती, काँग्रेसचे तर मेळावे होत होते, त्याबद्दल आपण भूमिका मांडल्याचे आठवत नाही”, असा टोला दरेकरांनी लगावला.
यात दरेकर यांनी कोविडच्या प्रोटोकॉलवर बोट ठेवून पवार यांच्या ‘झिंगाट’ डासवर टीका केली आहे. ती अजिबात चुकीची नाही. पण, कोविड प्रोटोकॉलचे सध्या किती पालन होते, हे दरेकरांना ठाऊक नसावे.कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी कोविड रुग्णाच्या वॉर्डमध्ये तर सोडा, पण त्या मजल्यावरही दुसऱ्यांना जाता येत नव्हते. आता कोरोना रुग्णाच्या जवळ साधे मास्क लावून त्याचे नातेवाईकही जात आहेत. बहुसंख्य रुग्णालयांत डॉक्टर पीपीई किट घालत नाहीत. कारण फ्रंटलाईन वर्कर म्हणून सर्व डॉक्टरांचे लसीकरण झालेले आहे. हीच स्थिती तेथील स्टाफची आहे. नातेवाईकांना आता फक्त मास्क लावून सोडले जाते.
ग्रामीण भागातील कोविड सेंटरमध्ये स्थिती याहून खुली असते. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, ज्यांचे लसीकरण (सामान्यांच्या आधी बहुसंख्य राजकारण्याचे लसीकरण थेट ‘सिरम’मध्ये झाले.) पूर्ण झाले आहे, असे रोहित पवार सुपर स्प्रेडर कसे होऊ शकतात, हा प्रश्न दरेकरांना पडला नसावा. फक्त राजकारण एकाच उद्दिष्टाने सर्व पहायचे म्हटल्यावर असेच घडणार आहे. काहीही असले तरी या ‘टिवटिव’ गांभीर्याने घेण्याची गरज नाही. तिचा उद्देश फक्त प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा आहे. त्यामुळे राजकारण्यां बरोबरच सामान्यांचीही करमणूक होत आहे, हे मात्र खरे. सोशल मीडियावर मात्र आपल्या नेत्यांचे कसे बरोबर आहे याची जोरदार चर्चा सुरू आहे.