जामखेड न्युज——
जीवनात यश मिळवण्यासाठी व्यसनापासून दूर रहावे – पोलीस निरीक्षक महेश पाटील
पै. सुजय तनपुरेचा नागरी सत्कार संपन्न

जीवनात यश मिळवण्यासाठी वेळेचे सुयोग्य नियोजन करावे तसेच व्यसनापासून दूर रहावे परिसरातील तरूणांनी आशियाई कुस्ती स्पर्धेत देशाला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या पै. सुजय तनपुरेचा आदर्श घ्यावा असे आवाहन पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी केले आहे.

शिऊर येथील पै. सुजय तनपुरे याने जॉर्डन येथे झालेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत देशाला सुवर्णपदक मिळवून दिले यामुळे परिसराचा व आपल्या देशाचा सन्मान वाढला आहे. हि. स्पर्धा २४ देशात होती यापैकी १७ देशाचे स्पर्धक सहभागी झाले होते. यात आपल्या देशाचे प्रतिनिधित्व सुजय तनपुरे याने केले होते. त्यांने मिळवलेल्या सुवर्णपदकाबद्दल जामखेड करांच्या वतीने भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती पासून महावीर भवन पर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक महेश पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी प्रकाश पोळ होते. यावेळी प्रा. मधुकर राळेभात, पंचायत समितीचे सभापती डॉ भगवानराव मुरूमकर, संजय वराट, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, माजी सभापती गौतम उतेकर, मंगेश (दादा) आजबे, जि.प.सदस्य सोमनाथ पाचरणे, रासपाचे विकास
मासाळ, प्रहारचे नय्युमभाई सुभेदार, जालींदर चव्हाण, डॉ. प्रकाश कारंडे, सदाशिव हजारे, बापु शिंदे, विकास तनपुरे, एकनाथ चव्हाण यांच्या सह विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच पैलवान व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना महेश पाटील म्हणाले की, यशस्वी करिअर करण्यासाठी आपले शरीर मजबूत ठेवण्यासाठी शारीरिक कसरत करावी व्यसनापासून दूर रहावे आणि एक आदर्श ठेवून वाटचाल करावी. तरूणांनी पै. सुजय तनपुरेचा आदर्श घ्यावा कारण अगदी लहान वयात मेहनतीच्या बळावर यश संपादन केले आहे असे पाटील यांनी सांगितले.
यावेळी बोलताना गटविकास अधिकारी प्रकाश पोळ म्हणाले की, पै.सुजय तनपुरे यांनी ग्रामीण भागात प्रतिकूल परिस्थितीमध्ये कष्ट करून यश मिळवलेले आहे. त्याने जिद्दीने यश मिळवून जामखेड तालुक्याचे तसेच देशाचे नाव उज्वल केलेले आहे. भविष्यातही त्याला अधिकाधिक यश मिळण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एकनाथ चव्हाण यांनी केले.



