शिक्षण विभाग भ्रष्टाचाराने पोखरला, विविध कामे व बदलीसाठी रेटकार्ड
आमदार रोहित पवार यांनी उठवला आवाज
पावसाळी अधिवेशनामध्ये शिक्षण विभागामध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून आमदार रोहित पवार यांनी आवाज उठवला. हॉटेलमध्ये गेल्यानंतर जसं रेट कार्ड असतं तसं शिक्षण विभागातील बदल्यांसाठी रेड कार्ड तयार करण्यात आल्याचा आरोप त्यांनी यावेळी सभागृहात बोलताना केला. हे रेटकार्ड त्यांनी सभागृहात सादर केलं आहे. शिक्षण विभागातील बदल्यामध्ये जर भ्रष्टाचार होत असेल तर एखादा अधिकारी सामान्यांना म्हणू शकतो की, मी इथे पैसे देऊन आलो आहे. यामुळे सामान्य माणसांचं काम होणार नाही. ते सरकारी सेवेपासून वंचित राहू शकतात.
शिक्षण आयुक्तांनी यासंदर्भातील पत्र एसीबीला स्वत: दिलं अशी परिस्थिती आहे. शिक्षण विभागामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार सुरू आहे असा आरोप त्यांनी सभागृहात केला आहे.
“कायम मुख्याध्यापक मान्यतेसाठी १ लाख घेतले जातात. मेडिकल बील मंजुरीसाठी २० टक्के घेतले जातात. आपण जर हॉटेलमध्ये गेल्यानंतर जसं मेनू कार्ड असतं तसं एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर फाईल पाठवायची असेल तर दक्षिणा घेतला जातो.
जर शिक्षण विभागामध्ये भ्रष्टाचार होत असेल तर हे खूप भयानक आहे. शिक्षण आयुक्तांनी जी तक्रार एसीबीला केली होती त्याचं पुढं काय झालं? असा प्रश्न मी सभागृहात करत आहे” असं रोहित पवार सभागृहात बोलताना म्हणाले आहेत.