जामखेड प्रतिनिधी
रूग्णांच्या शेजारी असलेले मृतदेह लवकर हलवावेत तसेच आम्हाला पक्के बील द्यावे अशी मागणी केली याचा राग आल्याने नगर येथील पॅसिफिक केअर सेंटर मधील डॉक्टर व कर्मचार्यांनी मारहाण केली अशी फिर्याद आकाश भागवत डोके (वय २६) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर येथील डॉक्टर सह पाच जणांविरोधात
जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या कोरोनाने सगळीकडे थैमान घातले आहे. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी जिवाची बाजी लावून कर्तव्य पार पाडत आहेत. मात्र पॅसिफिक केअर सेंटरमध्ये रुग्णाच्या नातेवाईकालाच मारहाण करण्यात आल्याची घटनासमोर आली आहे. कोविड सेंटरमधील मृतदेहाचे शुटिंग केल्याने आणि अधिकृत बिल मागितल्याने कोविड सेंटरचे कर्मचारी आणि डॉक्टराणी मारहाण केल्याची फिर्याद आज जामखेड पोलिस स्टेशनला दाखल केली आहे. आकाश डोके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डॉक्टर प्रशांत जाधव, कृष्णराज पाटील, बालकृष्ण पाटील, यश पोळ, बलराज पाटील यांनी मारहाण केल्याची फिर्याद जामखेड पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आली आहे.
डॉक्टरांनी मारहाण केलेल्या दोघांसह चार जनांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे त्यामुळे परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.
जामखेड मध्ये दाखल झालेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, नगर शहरातील पॅसिफिक केअर सेंटरमध्ये ५ मे रोजी. आमचे पाहुणे भागवत सुपेकर यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे दाखल करण्यात आले होते. त्यावेळी मी आकाश डोके व संजीव जाधव भेटण्यासाठी गेले असता सुपेकर हे खूप घाबरलेले होते. त्यांच्या आजूबाजूला ३ ते ४ मृतदेह अनेक तासांपासून पडून होते. ते हलवण्याची विनंती कोविड सेंटरच्या कर्मचाऱ्यांना केली. मात्र त्यांनी कुठलीही दखल घेतली नाही म्हणून आकाश डोके यांनी तेथील प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला.
रविवार कोविड सेंटरमध्ये डॉक्टर नव्हते, त्यामुळे सुपेकर यांचा मृत्यू झाला. त्यांना २६५००० रुपये भरण्यासाठी सांगितले. पण रितसर बिल भरण्यास मी तयार आहे, परंतु जास्त बिल भरण्यास नकार दिला. त्यामुळे मला डॉ. प्रशांत जाधव, कृष्णराज पाटील, बालकृष्ण पाटील, यश पोळ, बलराज पाटील यांनी मारहाण केली. गेट मधून मारहाण करत हॉस्पिटलच्या कोविड सेंटरमधील रूममध्ये डांबून ठेवले डॉ. आले व त्यांनीही लोखंडी गजाने मारहाण केली. असे फिर्यादीत म्हटले आहे.
मारहाणीनंतर या प्रकरणाची नगर शहरात चर्चा सुरू झाली. नंतर राजकीय दबाव टाकून प्रकरण मिटवण्यात आले आणि मृतदेह हॉस्पिटलमधून सोडण्यात आले. त्या नंतर रात्री उशिरा डॉ प्रशांत जाधव यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात आकाश डोकेसह चार जणांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
आम्ही मृतदेह ताब्यात घेऊन जामखेडमध्ये आलो अंत्यविधी केला आमच्या वरच गुन्हा दाखल झाला आहे असे कळले आम्हाला मारहाण झाली आमचा रुग्ण दगावला आणी आमच्यावरच गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे कोविड काळात रूग्णांची सेवा करण्याऐवजी मलिदा हडप करणारी राक्षसी प्रवृत्तींच्या लोकांना योग्य शासन व्हावे म्हणून आज आम्ही फिर्याद जामखेड पोलिस स्टेशनला दाखल केली आहे.
चौकट
कोरोना महामारीच्या काळात औषधोपचारासह चहा नाष्टा व दोन वेळच्या जेवणाची मोफत सोय करणारे आरोळे कोविड सेंटर एका बाजूला तर पैसे कमावण्यासाठी सुरू केलेले कोविड सेंटर दुसर्या बाजूला त्यामुळे प्रशासनाने अशा राक्षसी प्रवृत्तीचा नायनाट करावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडुन होत आहे.