जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
कोरोना महामारीने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. अनेक कुटुंबातील कर्ते लोक कोरोनामुळे बळी जात आहेत. सध्या लसीकरण मोहिम सुरू झाली आहे. आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांना अत्यावश्यक सेवा म्हणून लसीकरण झाले आहे. डेअरी व्यावसाय हाही अत्यावश्यक सेवा आहे तेव्हा डेअरी व्यवसायाशी संबंधित अधिकारी व कर्मचारी व व्यवसायाशी संबंधित सर्व लोकांचे प्राधान्याने लसीकरण करावे अशी मागणी अजित वराट यांनी केली आहे.
डेअरी उद्योग हा ग्रामीण अर्थकारणाचा मुख्य कणा असून शहरी नागरिकांच्या सुदृढ आरोग्याच्या दृष्टीने देखील महत्वाचा म्हणजेच ‘अत्यावश्यक सेवेमधील उद्योग आहे. ज्याप्रमाणे इतर अत्यावश्यक सेवा उद्योगांशी निगडित सर्वजण अहोरात्र आपले योगदान देत आहेत, त्याचप्रमाणे ग्रामीण दूध उत्पादकांनी उत्पादित केलेल्या दुधाचे संकलन करणे, त्यावर प्रक्रिया करणे, व वाहतुक, वितरण व विक्री, घरपोहोच सेवा देणे यासाठी डेअरी उद्योगाशी निगडित सर्वजण स्वतःचा जीव धोक्यामध्ये घालून अहोरात्र सेवा देत आहेत. गेल्या ५ दिवसांमध्ये आपल्या राज्याच्या विविध जिल्ह्यांमधील अनेक डेअरी उद्योगांशी संबंधित असणा-या तंत्रज्ञांचा व कर्मचाऱ्यांचा या कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे दुर्दैवी मृत्यू होऊन त्यांचे कुटुंबीय अक्षरशः मोठ्या अडचणीमध्ये आलेले आहेत. विविध डेअरी प्रकल्प धारकांमार्फत शासकीय वरिष्ठ स्तरावर डेअरी उद्योगाशी निगडित सर्वांचे प्राध्यान्याने लसीकरण करणेबाबत विनंती अगोदरच केलेली आहे. तरी लवकरात लवकर लसीकरण करावे अशी मागणी अजित वराट यांनी केली आहे.