देशाचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले – आमदार प्रा. राम शिंदे

0
218

जामखेड न्युज ——-

देशाचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले – आमदार प्रा. राम शिंदे

गोरगरिबांच्या कल्याणासाठी काम करणारे व देशाच्या इतिहासात सर्वांत ऐतिहासिक निर्णय घेणारे आणि सर्वांसाठी आदर्श ठरलेले नेतृत्व नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे आहे. त्यांनी गोरगरिबांसाठी विविध योजना राबवल्या. त्याचा फायदा जनतेला होत आहे,’’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने नऊ वर्ष यशस्वी पुर्ण केली या निमित्ताने महाजनसंपर्क अभियानांतर्गत आज आमदार प्रा. राम शिंदे यांनी जामखेड मध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशिद, पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख रवी सुरवसे, शहराध्यक्ष बिभीषण धनवडे, सलीम बागवान, नगरसेवक अमित चिंतामणी, ज्ञानेश्वर झेंडे, संचालक सचिन घुमरे, विष्णू भोंडवे, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचारणे, अँड, प्रविण सानप, प्रविण चोरडिया, अर्जुन म्हेत्रे, उद्धव हुलगंडे यांच्या सह मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

गोरगरीब जनतेला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक योजना राबवत यशस्वी केल्या

पीएम किसान सन्मान निधी योजना

2014 मध्ये मोदी यांनी पहिल्यांदा केंद्राची सूत्र हाती घेतली. 2019 ची निवडणुक जाहीर होण्यापूर्वी म्हणजेच 24 फेब्रुवारी 2019 रोजी त्यांनी शेतकऱ्यांना आकर्षित करणारी अशी पीएम किसान सन्मान निधी योजना जाहीर केली. शेतकर्‍यांना फायदा होणे हा या योजनेचा उद्देश. या योजनेनुसार प्रत्येक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी 6,000 रुपये जमा करण्यात येते. दोन दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये ती शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाते.

मोदी सरकारने आतापर्यंत या योजनेचे 12 हप्ते दिले आहेत. या योजनेचा लाभ कुटुंबातील पती, पत्नी आणि अल्पवयीन मुलांनाच घेता येतो. डिसेंबर ते मार्च 22 दरम्यान सरकारने 11 कोटी 11 लाख 96,895 लोकांना पैसे दिले. मात्र, या योजनेतही अनेकांनी आपले हात धुवून घेतले. त्यामुळे केंद्र सरकारने आता शेतकऱ्यांची वर्गवारी करण्याचा निर्णय घेतला आहे.

जन धन योजना

15 ऑगस्ट 2014 रोजी पंतप्रधान मोदी यांनी एक मोठा निर्णय घेतला. देशातील प्रत्येक कुटुंबाला बँकिंग व्यवस्थेशी जोडण्याची मोहिम त्यांनी सुरु केली. हीच ती जन धन योजना. मोदी यांची ही योजना पूर्णतः यशस्वी ठरली. 2022 मध्ये जन धन योजना अंतर्गत देशात 45 कोटींहून अधिक बँक खाती उघडण्यात आली. हा आकडा आता 48.99 कोटी इतका झाला.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना

मोदी सरकारच्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या योजनांपैकी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आहे. गरीब महिलांना मोफत एलपीजी गॅस कनेक्शन या योजनेअंतर्गत दिले जाते. 1 मे रोजी 2016 मध्ये ही योजना सुरू केली. सुरवातीला 1.5 कोटी कनेक्शन देण्याची योजना होती. पण, या योजनेचा प्रतिसाद इतका उदंड की ती संख्या 2.2 कोटी इतकी पोहोचली. वंचित कुटुंबांना 8 कोटी एलपीजी कनेक्शन देण्याचे उद्दिष्ट मार्च 2020 पर्यंत ठेवण्यात आले होते पण प्रत्यक्षात ते 7 सप्टेंबर 2019 रोजीच पूर्ण झाले.

पंतप्रधान गरीब कल्याण योजना

26 मार्च 2020 रोजी कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये ही योजना सुरु करण्यात आली. कोरोनामुळे लॉकडाऊन परिस्थितीत गरीब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मध्यमवर्गीय लोकांना मोफत रेशन देण्याची ही योजना होती. सुरुवातीला एप्रिल ते जून 2020 या कालावधीसाठी सुरू करण्यात आलेली ही योजना पुढे 30 सप्टेंबर 2022 पर्यंत वाढविण्यात आली. सुमारे 80 कोटी लोकांनी या योजनेचा लाभ घेतला. या योजनेसाठी मोदी सरकारने सुमारे ५.९१ लाख कोटी रुपये खर्च केले.

आयुष्मान भारत योजना

2018 मध्ये केंद्रीय अर्थसंकल्पातून आयुष्मान भारत योजनेची घोषणा करण्यात आली. एक लाख आरोग्य केंद्रे उभारून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना वार्षिक 5 लाख रुपयांच्या आरोग्य विमा संरक्षणासह जोडणे अशी ही योजना. 10 कोटींहून अधिक कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

हर घर जल योजना

2020 – 21 च्या अर्थसंकल्पात मोदी सरकारने हर घर जल योजनेची घोषणा केली. देशातील सर्व घरांमध्ये शुद्ध पाणी पुरवठा करण्याची ही योजना. 2024 पर्यंत ही योजना पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. सुमारे 3.5 लाख कोटी रुपयांची हि योजना आहे. यामुळे लोकांना पाण्यासाठी दूर जाण्याची गरज भासणार नाही.

चौकट

आमदार प्रा राम शिंदे यांनी आमदारकीच्या एका वर्षात दोनशे कोटी रुपये आणले आहेत यामुळे रस्ते, वीज पाणी या अनेक ठिकाणी असणाऱ्या समस्या सुटल्या तसेच जामखेड शहराला पाणीपुरवठा करणारी अडीचशे कोटी रुपयांची योजना अंतिम टप्प्यात आली आहे. लवकरच टेंडर प्रकिया सुरू होईल.

चौकट

विरोधकांना पराभव पचवता येत नाही माझा पराभव झाला व आमदार रोहित पवार विजयी झाले त्यावेळी मी माझ्या घरी बोलावून त्यांचा सत्कार केला पण मी आमदार झाल्यावर आमदार रोहित पवार यांनी साधे अभिनंदन देखील केले नाही. त्यांना सलग तीन पराभवाचे धक्के बसले म्हणून ते मतदारसंघात दडपशाही वातावरण निर्माण करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here