विखे शिंदे वाद पेल्यातील वादळ – फडणवीस शिंदेंच्या खुर्चीचे नाट्य; फडणवीसांनी चातुर्य दाखवून दोघांनाही खूश केले!

0
156

जामखेड न्युज——

विखे शिंदे वाद पेल्यातील वादळ – फडणवीस

शिंदेंच्या खुर्चीचे नाट्य; फडणवीसांनी चातुर्य दाखवून दोघांनाही खूश केले!

 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अहमदनगर जिल्हा दौऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीप्रसंगी माजी मंत्री आमदार राम शिंदे यांना खुर्ची न मिळाल्याने ते स्टेजच्या खाली उतरले. ते पाहिल्यानंतर फडणवीस यांनी त्यांना पुन्हा स्टेजवर बोलावून खुर्ची देण्याची व्यवस्था केली.

जिल्ह्यातील भाजपचे दोन ज्येष्ठ नेते महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि विधान परिषदेतील आमदार प्रा. राम शिंदे यांच्यातील वादाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. शिंदे यांनी विखे यांच्यासंबंधी पक्षाकडे तक्रारही केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नगरला होते. मात्र त्यांनी या दोघांनाही सोबत घेत समान स्थान दिल्याचे दिसून आले. या वादासंबंधी पत्रकारांनी विचारले असता ‘त्यांच्यात वाद असले तरी वादळ नाही. जे काही आहे, ते पेल्यातील वादळ आहे. तेही विरून जाईल. म्हणूनच आज दोघांनाही सोबत घेऊन बसलो आहे,’ असं उत्तर देत फडणवीस यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. असे असले तरी या पत्रकार परिषदेपूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात बसण्यासाठी शिंदे यांना खुर्चीच ठेवण्यात आली नसल्याचे आढळून आले. ऐनवेळी त्यांच्यासाठी फडणवीस यांनी हस्तक्षेप करीत खुर्चीची व्यवस्था करून शिंदे यांना शेजारी बसवून घेतले.

 

जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीपासून शिंदे आणि विखे या दोघांमध्ये वाद सुरू आहे. या निवडणुकीत खासदार डॉ. सुजय विखे पाटील व राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यात छुपी युती असल्याचा आरोप शिंदे यांनी केला. विखे पिता-पुत्र ज्या पक्षात जातात, त्या पक्षाच्या विरोधात काम करतात, असा आरोप शिंदे यांनी करून आपण या प्रकरणी वरिष्ठांकडे तक्रार केल्याचे म्हटले होते. तर छुप्या युतीचा आरोप फेटाळून लावून विखे पाटील यांनी शिंदे यांचा गैरसमज झाल्याचे म्हटले होते. मात्र हा वाद खदखदत आहे. त्यातूनच विखे पाटील यांनी आयोजित केलेल्या पक्षाच्या कार्यक्रमातही शिंदे सहभागी होत नसल्याचे दिसून आले होते.

 

फडणवीस यांच्या उपस्थितीत आज आयोजित सर्वच कार्यक्रमांवर विखे पाटील यांचीच छाप होती. हेलिपॅडवर स्वागत करण्यासाठी राम शिंदे गेले. मात्र, त्यानंतर फडणवीस यांच्या अल्पोपहाराची सोय सरकारी विश्रामगृहाऐवजी विखे पाटील यांच्या नगरमधील निवासस्थानी करण्यात आली होती. तेथे फडणवीस गेले. लोणी येथील निवासस्थानीही फडणवीस यांनी अचानक भेट दिली होती. आजही नगर शहरातील अन्य नेत्यांना टाळून फडणवीसांना आपल्या घरी नेण्यात विखे यशस्वी झाले.

त्यानंतर सरकारी विश्रामगृहाच्या भूमिपूजन कार्यक्रमात खुर्चीचा किस्सा रंगला. राम शिंदे भाजपचे नेते असले तरी ते केवळ आमदार आहेत. हा प्रोटोकॉल लक्षात घेऊन त्यांच्यासाठी फडणवीस यांच्याजवळ खुर्चीची व्यवस्था करण्यात आली नव्हती. तर पालकमंत्री असलेले विखे पाटील फडणवीस यांच्या शेजारी आणि खासदार या नात्याने सुजय विखे पाटीलही पहिल्या रांगेत बसलेले होते. राम शिंदे व्यासपीठावर आले, त्यावेळी त्यांना बसण्यासाठी खुर्ची नव्हती. हे लक्षात येताच स्वत: फडणवीस यांनी आपली खुर्ची सरकवत शिंदे यांच्यासाठी तेथे जागा करून दिली. स्वत: फडणवीसच लक्ष घालत असल्याचे पाहून यंत्रणा हालली आणि शिंदे यांच्यासाठी फडणवीस यांच्या बाजूलाच खुर्ची आणून ठेवण्यात आली. त्यानंतर पुढील सर्व कार्यक्रमांत फडणवीस या दोघा नेत्यांना सोबत घेऊन बसले.

राम शिंदे हे पूर्वीपासूनच फडणवीस यांचे कट्टर समर्थक समजले जातात. तर नव्याने पक्षात आलेले विखे यांनी खूप लवकर फडणवीस यांच्याशी जवळीक निर्माण केली आहे. असे असले तरी दोन्ही नेते आपल्यासाठी महत्त्वाचा असल्याचा संदेशच जणू फडणवीस यांनी आज दिला. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावरही त्यांनी दिलेले उत्तर हे सूचक होते.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here