जामखेड न्युज——
ऑनलाईन वाळू विक्रीचा बोजवारा!!! नागरिकांना घ्यावी लागते आठ ते नऊ हजार रुपये ब्रासने वाळू
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठ्या उत्साहाने महाराष्ट्र दिनाच्या दिवशी राज्यातील जनतेला ६०० रुपयांत एक ब्रास वाळू देण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार त्याचा प्रारंभ त्यांनी १ मे रोजी नगर येथे केला. मात्र, राज्याच उभारलेल्या या पहिल्याच वाळू डेपोत वाळू शिल्लक नसल्याने चार दिवसांपासून वाळूची ऑनलाईन विक्री पूर्णपणे थांबली आहे. यामुळे सरकारने केवळ उद्घाटनापुरतीच एक दिवस स्वस्तदरात वाळू उपलब्ध केल्याची चर्चा आहे. तसेच नगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात वाळू ठेकेच कोणीही घेतले नसल्याने तेथील नागरिकांना आँनलाईन वाळूचा कसलाही फायदा नाही त्यांना आठ ते नऊ हजार रुपये ब्रासने वाळू घ्यावी लागत आहे.
जामखेड तालुक्यात कोणीही वाळूची निविदा भरली नाही त्यामुळे लिलाव झाले नाहीत पर्यायाने नागरिकांना आँनलाईन वाळू मिळत नाही तर खाजगी ठेकेदाराकडून आठ ते नऊ हजार रुपये ब्रासने घ्यावी लागत आहे.
आता वाळू उपलब्ध होईल, त्या प्रमाणात विक्री केली जाईल, असे सरकारी अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.राज्य सरकारने २०१८ मध्ये वाळू लिलावात सुसूत्रता आणण्याच्या उद्देशाने नियम तयार करून २०१९ मध्ये त्याबाबत अधिसूचना प्रसिद्ध केली. मात्र, या अधिसूचनेतील नियमांचे पालन केले जात नसल्याचे लक्षात आल्यानंतर सरकारने पुन्हा नवीन वाळू धोरण जाहीर करणार असल्याचे काही महिन्यांपूर्वी जाहीर केले होते.
महसूलमंत्री विखे पाटील यांनी जाहीर केलेल्या नव्या धोरणानुसार वाळू लिलाव पूर्णपणे बंद करण्यात येणार असून, नागरिकांना सरकारी डेपोतून ६०० रुपये ब्रासप्रमाणे वाळू उपलब्ध केली जाईल. तसेच नवीन वाळू धोरण जाहीर करतानाच एक मे पासून राज्यात स्वस्त वाळू उपलब्ध होईल, असेही जाहीर केले होते. मात्र, वाळू घाट निश्चित करून तेथील वाळू उपशाचे प्रमाण ठरवणे तसेच वाळू उपसा करण्यासाठी ठेकेदारांची नियुक्ती करणे या बाबींसाठी लागणारा वेळ त्यांनी गृहित धरला नाही.
यामुळे राज्यात नवीन वाळू धोरण जाहीर झाल्यानंतर एप्रिलच्या अखेरपासून वाळू उपसा करण्यासाठी ठेकेदार नेमण्यासाठी टेंडर प्रक्रिया सुरू असताना महसूलमंत्र्यांनी एक मे रोजीचा आपला शब्द पाळण्याचा आग्रह धरला. यामुळे महसूल विभागाने नगरमध्ये एक मे रोजी उद्घाटनासाठी वाळूचा डेपो तयार केला व ग्राहकांना स्वस्त दरात वाळूही उपलब्ध केली. मात्र, हे वाळूचा मुबलक साठा उपलब्ध होत नसल्यामुळे १ मेला सुरू झालेली वाळू विक्री पूर्णपणे थांबली आहे. ग्राहकांची मागणी वाढण्याची शक्यता गृहीत धरून महसूल प्रशासनाने आता विविध नदीपात्रांमधून वाळू एकत्र आणण्याचे काम सुरू केले आहे.
सध्या नायगाव येथील पहिल्या वाळू डेपोत १ हजार ब्रास वाळू जमा झाली असून पुढच्या आठवड्यात ग्राहकांना ही वाळू सहाशे रुपये ब्रास दराने दिली जाणार आहे. गेल्या चार दिवसांत राज्यातल्या या पहिल्या वाळू डेपोतून एक कणही वाळू विक्री झालेली नाही. महसूल प्रशासनाने आता ग्राहकांची संख्या वाढण्याची शक्यता गृहीत धरून १ हजार ब्रास वाळू जमा केली असून, वाळूचा आणखी साठा वाढल्यानंतर थेट विक्री केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. तसेच नायगाव येथील वाळू विक्री ही केवळ प्रायोगित तत्वावर असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे सध्या विक्री बंद केली असून मुबलक साठा करण्यावर प्रशासनाचा भर दिला जात असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. अनेक ठिकाणी वाळू लिलाव झाले नाहीत तेथे लोकांना वाळू आठ ते नऊ हजार रुपये ब्रासने घ्यावी लागते.
सरकारी नियमानुसार वाळूच मिळत नाही.