जामखेड न्युज——
राष्ट्रवादीने नाराजांना दिले शेतकरी विकास समितीच्या सदस्यपदाचे गाजर!!!
विकास समिती सदस्यत्वाने नाराजी दुर होणार का❓
जामखेड बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी राम शिंदे आणि रोहित पवार या दोन्ही आमदारांनी कंबर कसली आहे. भाजपाच्या विरोधात आमदार रोहित पवार आणि विखे पाटील गट एक झाले आहेत. आमदार रोहित पवार यांच्या पँनलमधून ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, अशा नाराजांना राष्ट्रवादीने अक्षय तृतीयेच्या मुहर्तावर हळगाव कारखान्याच्या शेतकरी विकास समितीच्या सदस्यपदाचे ‘गाजर’ देऊन खुश करण्याचा प्रयत्न केला आहे,अशी जोरदार चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
जामखेड बाजार समिती निवडणुकीत आमदार रोहित पवार व आमदार राम शिंदे यांचे दोन पँनल एकमेकांसमोर उभे आहेत. आमदार रोहित पवार यांच्या बरोबर जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात आहेत तर आमदार प्रा. राम शिंदे यांच्या साथीला सामाजिक कार्यकर्ते प्रा. सचिन गायवळ आहेत. तर भाजपचा भाग असलेला विखे गट आमदार रोहित पवार यांच्याबरोबर आहे. राष्ट्रवादीतही नाराजीचा सुरू आहे. त्यामुळे दोन्ही पँनलमध्ये काट्याची टक्कर होणार हे निश्चित आहे.
बाजार समिती निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी राष्ट्रवादीने अनेक तुल्यबळ उमेदवारांना उमेदवारी नाकारली, याचे पडसाद अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी उमटले,अनेक उमेदवारांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. उमेदवारी निश्चित करणाऱ्या यंत्रणेवर काही नाराजांनी तोंडसुख घेतली. राष्ट्रवादीतील ही नाराजी अधिक उफाळून येऊ नये यासाठी आमदार रोहित पवार यांच्या यंत्रणेने हळगाव कारखान्याचा आधार घेतला. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर कारखान्यावर पुजा ठेवली.अख्खी राष्ट्रवादी तिथे आमंत्रित करण्यात आली.बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादीतील नाराजांनी दगाफटका करू नये यासाठी हळगाव कारखान्यावर शेतकरी विकास समितीचे भूत निर्माण करण्यात आले.या समितीत पक्षात नाराज असलेल्यांना घेण्यात आले. वास्तविक पाहता बाजार समिती निवडणूक नसती तर अशी समिती अस्तित्वातच आली नसती, त्यामुळे सदर समितीच्या निर्मितीचा घाट हा फार्स ठरणार अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
राष्ट्रवादीत गेल्या काही दिवसांपासून नाराजीचा सुरू आहे. कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत आमदार रोहित पवार हे निष्ठावंत कार्यकर्त्यांना राजकीय ताकद देतील अशी अपेक्षा होती, त्यादृष्टीने बाजार समिती निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली होती. इच्छुक उमेदवारांनी राष्ट्रवादीकडून मोठ्या संख्येत उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
काही महिन्यांपुर्वी शरिराने ( मनातून विखे समर्थक असलेल्या) राष्ट्रवादीत दाखल झालेल्या जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात आणि माजी सभापती सुधीर राळेभात या राळेभात बंधूंनी राष्ट्रवादीतच बंडाचे निशाण फडकावत बाजार समिती निवडणुकीत आमदार रोहित पवारांना जेरीस आणत जागावाटपाचा मुद्दा ताणून धरला. राळेभात बंधूंच्या हट्टापुढे पवारांना झुकावे लागले. पक्षातच युती झाली खरी, पण राळेभात यांच्या सोबतीला भाजपातील विखे गट आला. त्यात विखे गटालाही उमेदवाऱ्या मिळाल्या. यामुळे राष्ट्रवादीकडून संचालक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या कार्यकर्त्यांवर खरी संक्रात आली. राष्ट्रवादीचा पॅनल निश्चित होताच उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे फर्मान सोडण्यात आले. उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर काही इच्छुकांनी आगपाखड करत उघड नाराजी व्यक्त केली खरी पण अर्ज मागे न घेता बंडखोरी करण्याचे धाडस मात्र कोणीच दाखवले नाही.
उमेदवारी न मिळाल्याने राष्ट्रवादीतील जुन्या नव्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची तीव्र लाट पसरली, या नाराजीचा निवडणुकीत फटका बसू नये यासाठी राष्ट्रवादीकडून मनधरणीचा प्रयत्न सुरू झाला. पुढचे शब्द दिले जाऊ लागले पण त्याला यश मिळत नसल्याचे पाहून राष्ट्रवादीतील तथाकथित चाणक्यांनी हळगाव कारखान्याचा आधार घेत कारखान्यावर शेतकरी विकास समितीची स्थापन केली. या समितीत आमदार रोहित पवार यांच्या पॅनलकडून ज्यांना उमेदवारी मिळाली नाही अशा नाराजांना स्थान देण्यात आले. ही समिती नाराजांना खुश करण्यासाठी आहे हे दिसू नये यासाठी इतरही चेहर्यांना स्थान देण्यात आले. ज्यांची नावे या समितीत आली त्यांच्या समर्थकांनी तर आपल्या नेत्याची निवड कारखान्याचे संचालक म्हणून झाली अश्या पोस्ट सोशल मिडीयावर फिरवत कहरच केला. परंतू त्या नाराजांची दुधाची तहान ताकावर भागणार का ? हा खरा प्रश्न आहे.
हळगाव कारखान्याच्या शेतकरी विकास समितीच्या सदस्यपदाचे गाजर ज्यांना देण्यात आले ते काही अंशी खुश असले तरी अनेकांच्या मनात ही समिती बाजार समिती निवडणूक संपल्यानंतर अस्तित्वात असेल की बरखास्त होईल ? या शंकेचे काहूर माजवले आहे, त्यामुळे तालुक्यात या समितीच्या स्थापनेवरून उलट-सुलट चर्चा रंगली आहे.
हळगाव कारखान्याच्या शेतकरी विकास समितीत खालील कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात आला आहे.
किसनराव ढवळे (हाळगाव), सुंदरदास बिरंगळ (बावी), बाबासाहेब उगले (नायगाव), अमृत पाटील (जातेगाव), विलास जगदाळे (चोंडी), भगवान गीते (दिघोळ), नानासाहेब भोरे (कवडगाव), संतोष निगुडे (अरणगाव), आप्पासाहेब मोहळकर (नान्नज), सुरेश भोसले (सोनेगाव), बिभीषण परकड (लोणी), भाऊसाहेब सुळ (गोयकरवाडी), कांतीलाल वाळुंजकर (जवळके), गणेश चव्हाण (बोर्ले), दिपक पाटील (जवळा)
या समितीतील बहुतेक जण बाजार समिती साठी इच्छुक होते पण त्यांना पँनलमधून उमेदवारीची संधी मिळाली नाही म्हणून शेतकरी विकास समितीचे सदस्य करून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसने केलेला आहे. खरोखरच नाराजी दूर होईल का याचे उत्तर बाजार समितीच्या निकालातून दिसून येईल, तूर्तास नाराजांना शेतकरी विकास समितीचे दिलेले गाजर तालुक्यात जोरदार चर्चेत आहे.