जामखेड न्युज——
कोल्हेवाडी ग्रामस्थांचे निकृष्ट रस्ता कामाबाबत सुरू असलेले उपोषण अधिकाऱ्याच्या लेखी आश्वासनानंतर सुटले
कोल्हेवाडी ते वांजराफाटा निकृष्ट झालेल्या रस्ता कामाची चौकशी करावी तसेच संबंधित ठेकेदाराकडून योग्य काम करून घ्यावे म्हणून कोल्हेवाडीचे ग्रामस्थ आज तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. तेव्हा सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता श्रीनिवास लखापती यांनी खराब असलेले दोन किलोमीटरचे काम पुन्हा ठेकेदारामार्फत करण्यात येईल तोपर्यंत त्याचे बील अदा करण्यात येणार नाही असे लेखी पत्र उपोषण कर्त्याना दिले असता उपोषण मागे घेण्यात आले.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता श्रीनिवास लखापती, सरपंच हनुमंत पाटील, माजी उपसरपंच बळी कोल्हे, शिवाजी कोल्हे, रावसाहेब कोल्हे, किरण कोल्हे, ग्रामपंचायत सदस्य वाल्मीक कोल्हे, पंढरीनाथ कोल्हे, भास्कर कोल्हे, संजय सोंडगे, अशोक कोल्हे, सागर कोल्हे, बाबू कोल्हे, संग्राम कोल्हे यांच्या सह अनेक ग्रामस्थ हजर होते.
मागील आठवड्यात वांजराफाटा ते कोल्हेवाडी या तीन किलोमीटर रस्त्याच्या निकृष्ट काम दुरूस्त करावे तो पर्यंत ठेकेदाराचे बील अदा करण्यात येऊ नये म्हणून तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना दि. ३ एप्रिल पासून उपोषणाला बसणार म्हणून २९ मार्च रोजी निवेदन दिले होते. त्यानुसार आज पंधरा ते वीस ग्रामस्थ उपोषणाला बसले होते.
याची ताबडतोब दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता श्रीनिवास लखापती यांनी उपोषण स्थळी भेट देत दोन किलोमीटर रस्ता ठेकेदाराकडून पुन्हा दुरूस्त करून घेऊ तोपर्यंत बील अदा करण्यात येणार नाही असे लेखी पत्र दिल्यावर उपोषण मागे घेण्यात आले यावेळी पोलीस विभागाचे अविनाश ढेरे उपस्थित होते.