सहा हजार मेट्रिक टनाच्या गोदामामुळे शेतकरी व व्यापाऱ्यांच्या धान्य साठवणुकीची अडचण दूर आमदार रोहित पवारांच्या हस्ते शेतीमालाचे पुजन

0
150

जामखेड न्युज——

सहा हजार मेट्रिक टनाच्या गोदामामुळे शेतकरी व व्यापाऱ्यांच्या धान्य साठवणुकीची अडचण दूर

आमदार रोहित पवारांच्या हस्ते शेतीमालाचे पुजन

खर्डा व मिरजगाव येथील प्रत्येकी 3 हजार मेट्रिक टन क्षमतेच्या 6.29 कोटींच्या धान्य गोदामांचे काम पूर्ण; आ. रोहित पवार यांच्याकडून पाहणी व शेतीमालाचे पुजन

परिसरातील शेतकरी व व्यापाऱ्यांची धान्य साठवणुकीची मोठी अडचण झाली दूर


वखार महामंडळाच्या गोदामात धान्य ठेवण्याची सोय झाल्यास त्या भागातील शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लागतात. याच अनुषंगाने कर्जत तालुक्यातील मिरजगाव व जामखेड तालुक्यातील खर्डा येथे प्रत्येकी तीन हजार मेट्रिक टन धान्य साठवणूक क्षमतेचे दोन धान्य गोदाम महाविकास आघाडी सरकारच्या काळात आमदार रोहित पवार यांनी मंजूर करून आणले होते. यामध्ये खर्डा 3.15 कोटी आणि मिरजगाव 3.14 कोटी असे दोन्ही मिळून 6.29 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्याप्रमाणे आता त्याचे काम पूर्ण झाले असून नुकतीच आमदार रोहित पवार यांनी गोदामाला भेट देऊन गोदामांची पाहणी केली व शेतकऱ्यांच्या गोदामात ठेवण्यात आलेल्या धान्य पोत्यांचे (शेतीमालाचे) पूजन केले.

धान्य साठवणुकीसाठी शेतकऱ्यांना पूर्वी कोणतीही ठोस सुविधा उपलब्ध नव्हती. त्याचबरोबर शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी पुरेसे गोदाम हे आवश्यक असतात. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ शासनाच्या सार्वजनिक उपक्रमाद्वारे “साठवणुकीतून समृद्धीकडे” या योजनेतून शेतकऱ्यांनी गोदामात शेतीमाल साठवल्यास ऑनलाईन पीक पेऱ्यांची नोंद केली असल्यास साठवणूक भाड्यात 50 टक्के सवलत उपलब्ध असणार आहे. सदर गोदामात शेतीमाल साठवल्यास शेतकऱ्यांना व शेतकरी उत्पादक कंपन्यांना अभिनव ऑनलाइन शेतमाल तारण कर्ज योजनेअंतर्गत 9 टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध होणार आहे, तसेच वखार महामंडळाच्या गोदामांची वखार पावती कुठल्याही बँकेत तारण ठेवून कर्जाची सुविधा उपलब्ध असणार आहे.

गोडाऊनमध्ये साठवणूक केलेल्या मालास 100 टक्के विमा संरक्षण मिळणार आहे. तसेच गोदामात साठवणूक केलेल्या मालाचे शास्त्रशुद्ध पद्धतीने किडींपासून संरक्षण केले जाते हे विशेष. शेतकरी, व्यापारी व उद्योगवर्ग, खत कंपन्या विक्रेते, औषध विक्रेते कंपन्या व बांधकाम मटेरियल पुरवठादार अशा सर्वांसाठी गोदाम भाड्याने उपलब्ध असणार आहे. शेतकऱ्यांना शेतात तयार झालेल्या मालाला भाव नसेल तर या ठिकाणी आपला शेतीमाल ठेवून कर्ज सुविधा उपलब्ध होणार असल्याने त्याचा फायदा हा शेतकऱ्यांना होणार आहे.

चौकट
कर्जत जामखेड मध्ये वर्षानुवर्षे चांगल्या गोदामाची मागणी शेतकऱ्यांची होती. परंतु त्याबाबत सातत्याने दुर्लक्ष केल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागत होतं. शेतीमाल ठेवण्याची व्यवस्था नसल्यामुळे माल हा लवकर विकावा लागत होता आणि त्यामुळे कमी भावात माल विकला जात होता. या सर्व गोष्टींकडे बघता कर्जत आणि जामखेडमध्ये मिळून ६ हजार मेट्रिक टनाचे दोन गोदाम आम्ही बांधले असून ते लोकांच्या सेवेसाठी सुरू झाले आहेत हे पाहून आनंद झाला.

आमदार रोहित पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here