जामखेड न्युज——
अहील्यानगरी चोंडी गावठी दारूच्या विळख्यात..!
तरुणांनी दिला उपोषणाचा इशारा
निवेदनानंतर काही दिवसच अवैध धंदे राहतात बंद
जामखेड तालुक्यातील चोंडी हे गाव पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्म गाव असल्यामुळे गावाला पर्यटनस्थळ व तीर्थक्षेत्राचा दर्जा त्यामुळे येथे दररोज हजारो भाविक – भक्त भेट देण्यासाठी येतात परंतु चोंडी गावात विक्री होत असलेल्या अवैध दारू मुळे दारुड्या लोकांपासून त्यांना अवहेलना झेलावी लागते या काही तरी उपाय करून सर्व गुत्ते बंद करण्यात यावे यासाठी 25 ऑक्टबर रोजी मा.तहसीलदार व पोलीस निरीक्षक जामखेड यांना अर्ज व गावातील 200 महिला व पुरुष यांच्या सहीचे निवेदन प्रतिनिधी म्हणून मा. विजय भांडवलकर ,शरद शिंदे, दीपक मोरे,दादा सोनवणे यांनी दिले होते परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही थोड्या दिवस बंद करून पुन्हा पूर्ववत धंदे सुरू झाले आहेत.
गावालगत असलेले गायारान हे गावठी दारू काढण्याचे केंद्र बनले आहे, तेथून दारू पार्सल केली जाते, सर्व देशाला माहीत आहे गावठी दारूने मध्यंतरी गुजरात, पंजाब आणि उत्तरप्रदेश या ठिकाणी किती लोक मृत्युमुखी पडले होते, हे दारू काढताना विषारी पदार्थांचे मिश्रण वापरतात यामुळे जर काही जीवितहानी जर झाली तर कोण जिम्मेदारी घेणार ?
गावातील गोर – गरीब महिला रात्रंदिवस काबाडकष्ट करून संसाराचा गाडा चालवतात परंतु या गावठी दारूने त्यांचे मानसिक, शारीरिक, भावनिक संतुलन पूर्णतः लोप पावले आहे कारण त्यांनी कमावलेले दोन – चार पैसे त्यांचे पती हिसकावून घेतात व दारू पिऊन येतात यामुळे घराची आणि गावाची शांतता भंग होऊन कलह निर्माण होतो , आम्ही तरुण मुलांनी खुप वेळा दारू विक्री करणाऱ्या लोकांना समजावून सांगितले पण ऐकत नाहीत उलट बोलतात ‘ आम्ही त्यांना पत्र पाठवतो का आमच्याकडे या प्यायला म्हणून ‘ काही बोलतात आम्ही कशावर जगायचे.. हे ना ते न पटण्यासारखे कारण देतात.
दारूबंदी विषयी गावचे पुढारी मात्र मौन धरून आहेत त्याना काही देणं घेणं नाही फक्त मत मिळाली म्हणजे बस झालं मग आया – बहिणीचे संसार उध्वस्त झाले तरी चालतील. आता आम्ही गावच्या तरुण मुलांनी निर्धार केला आहे की लवकरात लवकर जर दारू बंद नाही झाली आणि संबंधितांवर कार्यवाही नाही झाली तर लवकरच ग्रामपंचायत कार्यालयाच्या दरवाज्यासमोर महिलांचे अमरण उपोषण केले जाईल.