मदारी वसाहत बांधकामाबाबत लेखी आश्वसनानंतर वंचितचे आंदोलन मागे. एका महिन्याच्या आत वसाहतीचे काम सुरू होणार

0
160

जामखेड न्युज——

मदारी वसाहत बांधकामाबाबत लेखी आश्वसनानंतर वंचितचे आंदोलन मागे.

एका महिन्याच्या आत वसाहतीचे काम सुरू होणार

जामखेड तालुक्यातील खर्डा येथील मदारी वसाहतीचे बांधकाम तात्काळ सुरू करण्यात येईल असे लेखी आश्वासन पत्र समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे यांनी उपोषणकर्त्या कार्यकर्त्यांना दिल्या नंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन मागे घेण्यात आले.

याबाबतचे लेखी पत्र समाज सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या भटके विमुक्त समितीचे राज्य सह समन्वयक ॲड. डॉ. अरुण जाधव यांना दिले. यावेळी जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, लोकाधिकार आंदोलनाचे प्रवक्ते बापू ओहोळ, तालुकाध्यक्ष विशाल पवार, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे, उपाध्यक्ष अरविंद सोनटक्के, वंचित चे जामखेड तालुका अध्यक्ष अतिष पारवे, शहराध्यक्ष अजिनाथ शिंदे, सरदार मदारी, हुसेन मदारी, सलीम मदारी, रेश्मा मदारी, गणपत कराळे, मच्छिंद्र जाधव, बाबुराव फुलमाळी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

जामखेड तालुक्यातील खर्डा येथील यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत ६ वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या मदारी वसाहतीचे बांधकाम तात्काळ सुरू करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मंगळवार दि. ३ जानेवारी रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे अवचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मदारी समाज बांधव, भगिनी व मुलांबाळांसह पाल ठोकून घर देता का घर असे अनोखे आंदोलन सुरू करण्यात आले होते.

मदारी समाजातील महिलांच्या हस्ते क्रांती ज्योती सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून हे आंदोलन सुरू करण्यात आले होते. मदारी समाज वसाहतीचे बांधकाम झालेच पाहिजे, क्रांती ज्योती सावित्री बाई फुले, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज यांच्या जयजयकाराच्या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणला होता. यावेळी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, सहाय्यक समाज कल्याण आयुक्त राधाकिसन देवढे, अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांच्या बैठकीत चर्चा होऊन मदारी वसाहत बांधकामास मान्यता देण्यात आली. व सदर वसाहतीचे बांधकाम १ महिन्याच्या आत सुरू करण्यात येईल असे लेखी आश्वासन देण्यात आले.

या आंदोलनात फिरोज शेख, ज्ञानदेव वाघ, नरसिंग भोसले, योगेश गुंजाळ यांच्यासह मदारी समाज बांधव व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here