जामखेड न्युज——
बालविवाह रोखण्यासाठी सर्वानी सावध राहा
-प्रकाश पोळकुटुंबात समानता असेल तरच समाजात समता नांदेल -ज्योती बेल्हेकर
बालविवाह करणे आणि ते घडवून आणणे हे अप्रगत समाजाचे लक्षण आहे.कायद्याने मुलीला मुलाप्रमाणे समान हक्क आणि अधिकार बहाल केले आहेत.समाज मात्र मुलीला ओझे समजून दुय्यम स्थान देतो.बालविवाहबाबत सामाजने मुला-मुलीच्या आयुष्य आणि भविष्यावर होणाऱ्या दुष्परिणामांचा विचार करून प्रसंगी कायद्याचा आधार घेऊन बालविवाह रोखण्यासाठी सजग राहा असे प्रतिपादन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी केले.
स्नेहालय,जिल्हा महिला बालविकास विभाग,जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि पंचायत समिती जामखेड यांच्या संयुक्त विद्यमाने उडान बालविवाह प्रतिबंध अभियाना अंतर्गत आयोजित बालविवाह प्रतिबंध जाणीव जागृती कार्यशाळाप्रसंगी ल.ना.होशिंग विद्यालय सभागृहात अध्यक्षीय स्थानावरून ते बोलत होते.यावेळी विचार मंचावर वैधकीय अधीक्षक डॉ.शशांक वाघमारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बोराडे, महिला व बालविकास अधिकारी ज्योती बेल्हेकर, स्नेहालय जिल्हा समन्वयक योगेश अब्दुले,चाईल्ड लाईन केंद्र समन्वयक महेश सूर्यवंशी,उडान बालविवाह प्रतिबंध अभियानाचे प्रवीण कदम, मजहर खान, ग्रामीण विकास केंद्राचे अध्यक्ष समीर पठाण,प्राचार्य श्रीकांत होशिंग उपस्थित होते.पुढे बोलतांना ते म्हणाले की,सामाजिक जाणिवा अधिक प्रगल्भ करत मुलगा मुलगी असा भेदभाव न करता समता स्थापित करण्यासाठी समाजाने परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करून बालविवाह प्रसतिबंधासाठी सामाजिक वज्रमुठ निर्माण करू असेही ते म्हणाले.
असमानता दूर करून बालविवाह रोखुया – डॉ.सुनील बोराडे
बालविवाह कार्यशाळेस संबोधित करतांना तालुका आरोग्य अधिकारी डॉ.बोराडे म्हणाले की;बालविवाहामुळे समाजाला सामाजिक, शैक्षणिक, शारीरिक आणि मानसिक दुष्परिणामांना सामोरे जावे लागते.शालेय अभ्यासक्रमात मुला मुलींना लैंगिक शिक्षण आणि निर्णय घेण्याप्रति अधिक सक्षम करून बालविकासास प्रोत्साहन देऊया आणि असमानता दूर करून बालविवाह टाळूया ते म्हणाले.
कुटुंबात समानता असेल तरच समाजात समता नांदेल.-ज्योती बेल्हेकर
यावेळी महिला व बालविकास अधिकारी ज्योती बेल्हेकर म्हणाल्या की;कौटुंबिक हिंसाचारापासून मुली आणि महिलांना अनेक पातळीवर संघर्ष करावा लागत आहे.बालवायमध्येच विवाह लावून दिले जात असून त्याचे परिमाण राष्ट्राला भोगावे लागत आहे.समाज मात्र कायद्याविरुध्द भूमिका घेऊन बालविवाह घडवून आणत आहे.याला प्रतिबंध करण्यासाठी मुलींच्या उच्च शिक्षणासाठी त्यांना प्रोत्साहन देणे ही सामाजिक जबाबदारी असून
कुटुंबात समानता असेल तरच समाजात समता नांदेल असे परखड मतही त्यांनी व्यक्त केले.
*बालविवाह निर्मूलनसाठी सामाजिक बदलाची गरज-समीर पठाण*
ग्रामीण विकास केंद्राचे अध्यक्ष समीर पठाण म्हणाले की:बालवयात मुला-मुलींची लग्ने लावून त्यांच्या आरोग्यावर, मानसिक विकासावर आणि आनंदी जीवनावर परिणाम होतो. लहान वयात लग्न लावून दिल्याने संपूर्ण समाजात मागासलेपणा येते.शेवटी बालविवाह समाजाच्या प्रगतीत अडथळा ठरते.बालविवाह निर्मूलनसाठी सामाजिक बदलाची गरज आहे असे ते म्हणाले.यावेळी चाईल्ड लाईनचे केंद्र समन्वयक महेश सुर्यवंशी आणि उडान बालविवाह प्रतिबंधक अभियानाचे प्रवीण कदम यांनी १०९८ या टोल फ्री क्रमांकाची माहिती देत बालकांच्या गंभीर प्रश्नांवर मार्गदर्शन केले.यावेळी तालुक्यातील ग्रामसेवक,अंगणवाडी सेविका, स्वयंसेवी संस्थेचे कार्यकर्ते,विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी योगेश अब्दुले,मजहर खान,रामदास काकडे, विजय वेदपाठक, मोहित कदम यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण कदम,सूत्रसंचालन योगेश अब्दुले तर मजहर खान यांनी आभार मानले.