श्रेयवादासाठी विरोधकांनी कर्जत जामखेडमधील जलसंधारण कामे रोखली -आमदार रोहित पवार

0
171

जामखेड न्युज——

श्रेयवादासाठी विरोधकांनी कर्जत जामखेडमधील जलसंधारण कामे रोखली -आमदार रोहित पवार

 

नगर दक्षिणमधील फक्त कर्जत-जामखेड तालुक्यातील जलसंधारणाच्या कामांना रोखले; आ. रोहित पवारांनी मंजूर करून आणलेल्या सर्व कामांचा समावेश

नगर जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या कामाच्या स्थगित्या उठवल्या मात्र कर्जत-जामखेडवर अन्याय; राम शिंदेंनी श्रेयासाठी रोखली कामे

विकासाच्या बाबतीत गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील लोकांना पाण्याचा गंभीर प्रश्न कायमच सतावत आला आहे. २०१९ साली आमदार म्हणून रोहित पवार यांनी कर्जत जामखेडची सूत्रे आपल्या हातात घेतली आणि जलसंधारणाची आतापर्यंत कधीही न झालेली कामे त्यांनी करून घेतली तसेच वैयक्तिक पातळीवर लक्ष घालून आणि शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा करून जलसंधारणाची विविध कामे महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर करून आणली आणि त्या सर्व कामांच्या निविदा प्रक्रिया देखील पूर्ण झाल्या होत्या. परंतु सध्याच्या सरकारने दिलेल्या स्थगितीमुळे कामांना रोख लागली त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार २५ ऑक्टोबर रोजी कामावरील स्थगिती उठवणे अपेक्षित असताना विशेषतः नगर दक्षिणमधील फक्त कर्जत आणि जामखेड हे २ तालुके फक्त राजकीय स्वार्थापोटी त्यातून वगळण्यात आले आहेत.

कर्जत जामखेड तालुक्यातील जलसंधारणाची आ. रोहित पवार यांनी मंजूर करून आणलेली कामे निविदा प्रक्रिया झालेल्या असताना देखील फक्त श्रेयवादासाठी विरोधकांनी त्यावरील स्थगिती उठवली नाही, असा आरोप आ. रोहित पवार यांनी केला आहे. दरम्यान, जलसंधारणाच्या कामांमध्ये कोल्हापुरी बंधारे आणि साठवण तलाव यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे नगर दक्षिण मधील सर्व तालुक्यातील कामांची स्थगिती उठवली असताना मात्र कर्जत-जामखेड तालुक्यावर आणि येथील जनतेवर अन्याय झाला असल्याचं या माध्यमातून स्पष्ट होत आहे. तसेच फक्त कर्जत आणि जामखेड हे दोनच तालुके वगळणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.

कर्जत-जामखेड तालुक्यातील आमदार रोहित पवार यांनी मंजूर करून आणलेल्या आणि सध्या स्थगित असलेल्या जलसंधारणाच्या कामांमध्ये दोन्ही तालुक्यातील मिळून 29 कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे आणि साठवण तलाव यांचा समावेश आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर दोन्ही तालुक्यात मिळून जवळपास 1110 टीसीएम अतिरिक्त पाणीसाठ्यात वाढ होणार असून आणि तब्बल 392 हेक्टर नव्याने सिंचित क्षेत्र तयार होणार आहे. त्याचा फायदा हा आसपासच्या 25 गावातील हजारो शेतकऱ्यांना होणार आहे. या कामांना सरकारने स्थगिती दिली नसती तर आतापर्यंत सर्व कामे सुरू होऊन येत्या पावसाळ्यात त्याचा फायदा हा शेतकऱ्यांना नक्कीच झाला असता. परंतु जनतेच्या हितापेक्षा राजकारण महत्वाचं असणाऱ्या लोकांमुळे ही कामे रखडली आहेत, अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे. लवकरात ही कामे सुरू व्हावी आणि कर्जत जामखेडवर अन्याय होणार नाही यासाठी आमदार रोहित पवार प्रयत्न करत आहेत.

प्रतिक्रिया (चौकट) –

नगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या कामांच्या स्थगिती उठतात. शिवाय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची सहकार्याची भूमिका असतानादेखील राम शिंदे शासन दरबारी उंबरठे झिजवत कर्जत-जामखेडमधील सगळ्याच कामांना स्थगिती द्या मला त्याचं श्रेय घ्यायचं आहे, असं म्हणत असल्याने विकासाला बाधा निर्माण होत आहे. असे गलिच्छ राजकारण थांबवण्याची गरज आहे अन्यथा कर्जत-जामखेडची जनता शांत बसणार नाही. – आमदार रोहित पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here