जामखेड न्युज——
दोन्ही आमदारांनी द्वेषाचे राजकारण सोडून विकासाचे राजकारण करावे- प्रा. कैलास माने
दोन आमदारांनी जाहिर केलेली पाणीपुरवठा योजना कागदावरच शहरवासीयांना आठ दिवसाआडच पाणी
जामखेड साठी दोन आमदार आहेत. दोन्ही आमदारांमध्ये सध्या द्वेषाचे राजकारण सुरू आहे हे थांबवून विकासाचे राजकारण करावे जामखेड साठी डीपी प्लॅन शहर विकास आराखडा मंजूर करावा व पाणीपुरवठा योजना मार्गी लावावी असे अशी मागणी प्रा. कैलास माने शिवसेना शिंदे गट तालुका प्रमुख यांनी पत्रकार परिषदेत केली.

कर्जत-जामखेड साठी बऱ्याच वर्षानंतर दोन आमदार लाभले आहेत. आगोदर आमदार सदाशिव लोखंडे व रामदास फुटाणे हे दोन आमदार होते पण त्यांनी कधीही द्वेषाचे राजकारण केले नाही. सध्या आमदार रोहित पवार व आमदार प्रा. राम शिंदे यांच्यात द्वेषाचे राजकारण दिसत आहे. तुम्ही राजीनामा द्या मी राजीनामा देतो असे दोघांमध्ये राजीनामा नाट्य रंगले आहे. दोन्ही आमदारांनी विकासाचे राजकारण करावे. जामखेड शहराचा डीपी प्लॅन शहर विकास आराखडा मंजूर करावा म्हणजे अनेक प्रश्न मार्गी लागतील.

तीन वर्षांपूर्वी जामखेड पाणीपुरवठा योजना मंजरीचा कागद तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जामखेड वासीयांना दाखवला होता. उजणी धरणातून आमदार प्रा राम शिंदे यांच्या प्रयत्नातून शहरासाठी पाणीपुरवठा योजना मंजूर झाली असे सांगितले होते पण नंतर सरकार बदलले राम शिंदे यांचा पराभव झाला आमदार रोहित पवार विजयी झाले.

आमदार रोहित पवार यांनी उजणी धरणातून सुधारित पाणी पुरवठा योजना परत मंजूर करून आणली याविषयी पेपरबाजी झाली. आता तीन वर्षे झाली तरीही जामखेड शहराची पाणी योजना कागदावरच आहे. शहरवासीयांना आठ दिवसाआड पाणी मिळत आहे. शहराला पाणीपुरवठा करणारा भुतवडा तलाव ओसंडून वाहत आहे तरीही आठ दिवसाआड पाणी मिळत आहे. तेव्हा दोन्ही आमदारांनी एकत्र येऊन शहराची पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर कार्यान्वित करावी असे शिवसेना शिंदे गट तालुका प्रमुख कैलास माने यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

तसेच जामखेड शहराचा विकास आराखडा डीपी प्लॅन मंजूर झाला तर अनेक प्रश्न मार्गी लागतील कर्जत जामखेड वगळता इतर पालिकेत डीपी प्लॅन मंजूर आहेत. डिपी प्लॅन मंजूर नसल्याने गुंठेवारी बंद आहे यामुळे व्यापारपेठ थंड आहे. एक तर दोन वर्षे कोरोनामुळे अनेक जण आर्थिक अडचणीत आहेत. त्यामुळे ताबडतोब शहर विकास आराखडा मंजूर केला पाहिजे. असेही प्रा. कैलास माने यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

दोन्ही आमदारांनी शहर व तालुक्याच्या विकासासाठी निधी आणण्यासाठी चढाओढ करावी. विकासाची कामे मार्गी लावावीत शहर विकास आराखडा मंजूर करावा अशी मागणी पत्रकार परिषदेत प्रा. कैलास माने यांनी केली










