जामखेड न्युज——
वीस वर्षांनी भरला “दहावी 2002” च्या विद्यार्थ्यांचा वर्ग शिक्षकांचा विशेष सन्मान
जवळा येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय येथील सन २००२ मधील दहावीच्या विद्यार्थ्यांचा ‘माजी स्नेहमेळावा दहावी बॅच 2002’ नुकताच पार पडला. तब्ब्ल वीस वर्षांनी जुने विद्यार्थी तसेच त्यांना त्यावेळी शिकविणारे शिक्षक एकत्र आल्याने त्या विद्यार्थ्यांचा वीस वर्षांनी वर्ग भरल्याचे दृश्य दिसून आले.

स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने एकत्र येण्यासाठी तेव्हाचे विद्यार्थी सद्याची राहती ठिकाणे दूर असूनही आनंदाने विद्यालयात जमा झाले होते. यावेळी जुन्या आठवणींना उजाळा मिळत गेल्याचे दिसून आले.

सदर प्रसंगी सुरुवातीला माजी सभापती प्रा. सुभाषराव आव्हाड यांच्या हस्ते मेळाव्याचे उदघाट्न करण्यात आले. यावेळी आदर्श शिक्षक किसनराव मेहेर हे अध्यक्षस्थानी होते. तर छत्रपती शिवाजी विद्यालयाचे जवळा विद्यालयाचे विद्यमान प्राचार्य महादेव सुपेकर हे प्रमुख उपस्थित होते.

यावेळी दहावी २००२ च्या बॅचमधील विद्यार्थ्यांनी त्यांना त्यावेळी विद्यालयात तसेच प्राथमिक शाळेत ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांचे औक्षण करुन आशीर्वाद घेत, कृतज्ञतापूर्वक सन्मानचिन्ह देत, विशेष सन्मान करुन ऋण व्यक्त केले. याशिवाय शाळेविषयी कृतज्ञता म्हणून विद्यालयास तसेच जिल्हा परिषद शाळेस मदतीचा हात देण्याची घोषणा केली.

या मेळाव्यास उपस्थित राहिलेल्यांनी शिक्षक, शाळा तसेच सहकारी विद्यार्थी, विद्यार्थिनी यांच्याविषयी मनोगते व्यक्त केली. शेवटी स्नेह भोजनाने मेळाव्याची सांगता करण्यात आली. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी दहावी २००२ बॅचमधील विद्यार्थ्यांच्या नियोजन समित्यानी विशेष परिश्रम घेतले.

मेळाव्याची वैशिष्ट्ये
– 2002 मधील विद्यार्थी तब्ब्ल 20 वर्षांनी पुन्हा शाळेत एकत्र, आकर्षक रांगोळ्यांमुळे वातावरण उत्साही.– शाळेत जमलेल्या तेव्हाच्या या विद्यार्थ्यांनी परिपाठ घेत जुन्या आठवणींना दिला उजाळा
– उपस्थितांपैकी बहुतेक जण वेगवेगळ्या क्षेत्रात प्रभावी योगदान देणारे, मात्र मेळाव्याच्या निमित्ताने विद्यार्थी म्हणूनच वावरत होते.
– शिक्षकांना दिला गेला विशेष सन्मान, शिक्षकही भारवले.
– सर्वानी फेटे परिधान केलेले असल्यामुळे वातावरणात उत्साह
– दिवंगत शिक्षकांना वाहिली श्रद्धांजली. त्यांच्या आठवणींनी उपस्थितांना गहिवर.
– मेळाव्याचे नियोजन अतिशय उत्कृष्ट. शिक्षकांकडून शाबासकी. वीस वर्षांनी एकत्र आलेल्या मैत्रिणींना वेळ कमी पडला.










