जिद्दीने यशाला गवसणी घाला: न्या.सपकाळ – दत्तवाडी शाळेतील आजी-माजी विद्यार्थ्यांचे तालुका व जिल्हास्तरावर मोठे यश – आराध्य नागरगोजे ऑनलाईन वक्तृत्त्व स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम

0
208
जामखेड प्रतिनिधी 
जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
यशस्वी जीवन जगण्यासाठी सुयोग्य मार्गदर्शन व कठोर परिश्रमाची नितांत आवश्यकता असून इप्सित ध्येय साध्य करण्यासाठी जिद्दीने यशाला गवसणी घाला असे मार्गदर्शन जामखेड न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश पी.व्ही.सपकाळ यांनी तालुक्यातील धोंडपारगाव येथील जिल्हा परिषदेच्या दत्तवाडी प्राथमिक शाळेतील आजीमाजी विद्यार्थ्यांना केले.
         महाराष्ट्र  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने ‘बालदिवस सप्ताह’ कार्यक्रमांतर्गत राज्यस्तरीय विविध ऑनलाईन स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धेचा  निकाल नुकताच  जाहीर झाला असून त्यात दत्तवाडी शाळेतील एकूण सात आजी-माजी विद्यार्थ्यांनी तालुकास्तरावर  घवघवीत यश प्राप्त केले तसेच आराध्य नागरगोजे याचा वक्तृत्व स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक आला. या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ शनिवार दि.27मार्च2021 रोजी ल.ना.होशिंग विद्यालय जामखेडचे प्राचार्य श्रीकांत होशिंग यांचे अध्यक्षतेखाली व जामखेड न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश पी.व्ही.सपकाळ यांचे प्रमुख उपस्थितीत दत्तवाडी शाळेत संपन्न झाला.
         मराठी भाषेचे ज्येष्ठ अभ्यासक व भाषातज्ज्ञ असलेले प्रा.श्रीकांत होशिंग यांनी आपल्या ओघवत्या व प्रभावी कथाकथनशैलीद्वारे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व मूल्यशिक्षणाचे महत्त्व प्रतिपादन करत दत्तवाडी शाळा ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्तेचे केंद्र असून मागील अनेक वर्षांपासून सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करणारे येथील आदर्श शिक्षक श्री मनोहर इनामदार हे  या विद्यामंदीराचे निष्ठावंत उपासक आहेत असे गौरवोद्गार काढले.
        नान्नज केंद्राचे केंद्रप्रमुख बाबासाहेब कुमटकर आणि धोंडपारगावच्या सरपंच मनीषा औदुंबर शिंदे यांनी ऑनलाईन स्पर्धेत सहभागी झालेल्या तसेच पारितोषिके प्राप्त केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
 यावेळी आराध्य नागरगोजे याने ‘मी नेहरू बोलतोय’ या विषयावर केलेले भाषण, अभिजीत धुमाळ याने ‘चाचा नेहरूंना लिहिलेल्या पत्राचे’ केलेले प्रकटवाचन आणि  जयशंकर शिंदे या विद्यार्थ्याने आत्महत्या केलेल्या वडिलांना त्यांच्या लाडक्या चिमुकल्याने घातलेली साद या आशयाच्या  ‘आठवण’ या स्वरचित कवितेचे केलेले सादरीकरण लक्षवेधी ठरले.
तालुकास्तरीय पारितोषिक प्राप्त गुणवंत विद्यार्थी खालीलप्रमाणे:
1) आराध्य परशुराम नागरगोजे इ.1ली (भाषण स्पर्धेत प्रथम)
2)अभिजीत मनोहर धुमाळ इ.5वी (पत्रलेखन स्पर्धेत द्वितीय)
3) प्रेरणा संतोष भांडवलकर इ.4थी (पत्रलेखन स्पर्धेत तृतीय )
4) अमृता बळीराम शिंदे इ.7वी ल.ना.होशिंग विद्यालय जामखेड (स्वरचित कविता सादरीकरण स्पर्धेत  द्वितीय)
5)जयशंकर दत्तात्रय शिंदे इ.6वी नंदादेवी विद्यालय नान्नज (स्वरचित कविता सादरीकरण स्पर्धेत तृतीय)
6)ज्योती मनोहर धुमाळ इ.10वी ल.ना.होशिंग विद्यालय जामखेड (निबंध स्पर्धेत  द्वितीय)
7) वैष्णवी युवराज धुमाळ इ.10वी ल.ना.होशिंग विद्यालय जामखेड(निबंध स्पर्धेत  तृतीय)
या विद्यार्थ्यांसह दैनिक मराठवाडा साथी आयोजित  ‘बालधमाल’ राज्यस्तरीय ऑनलाईन वेशभूषा स्पर्धेत पूर्वप्राथमिक गटात ‘राज्यात प्रथम’ क्रमांक प्राप्त केलेल्या विराज विजय जेधे या विद्यार्थ्याचा विशेष गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समिती दत्तवाडीचे अध्यक्ष बळीराम शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन मनोज कांबळे व जयश्री दळवी कांबळे या शिक्षक दांपत्याने केले तर प्रस्तावना व आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक मनोहर इनामदार यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here