नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी डॉ. तांबे व विखे लढत होणार?

0
246

 

जामखेड न्युज——

नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी डॉ. तांबे व विखे लढत होणार?

डॉ. राजेंद्र विखे पाटील भाजपच्या उमेदवारीचे प्रबळ दावेदार

 

नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू तथा प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती तथा प्रवरा मेडिकल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र विखे पाटील भाजपच्या उमेदवारीचे प्रबळ दावेदार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

दोन दिवसांपूर्वी मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व डॉ. राजेंद्र विखे पाटील यांच्यात भेट झाली.

या भेटीचा फोटो शुक्रवारी व्हायरल झाला. सोबतच भाजपकडून डॉ. विखे यांना नाशिक पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी घोषित झाल्याची चर्चाही पसरली. या चर्चांनुसार, डॉ. विखे यांची उमेदवारी राज्यातील नेतृत्वाने जवळपास निश्चित केली असून केंद्रीय नेतृत्वाकडून दोन दिवसांत यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

भाजपकडून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना राजकीय ताकद देण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आल्याची चर्चा भाजपच्या अंतस्थ वर्तुळात
आहे. त्यास जोडून डॉ. राजेंद्र विखे यांच्या उमेदवारीच्या शक्यतेकडे पाहिले जात आहे.

 

नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी काँग्रेस पक्षाकडून (Congress) विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे (Dr. Sudhir Tambe) हे उमेदवार असतील, असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आज (ता. ७ ऑक्टोबर) जाहीरपण सांगितले. डॉ. तांबे हे गेली दोन टर्मपासून या मतदासंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे ते मेहुणे आहेत. तर भाजपाकडून राजेंद्र विखे पाटील यांचे नाव चर्चेत आहे. त्यामुळे विखे व थोरात सामना परत रंगणार अशी चिन्हे दिसत आहेत.

नाना पटोले म्हणाले की, विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका लागल्या आहेत. नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघ, तर अमरावती आणि नाशिक पदवीधर मतदारसंघाचा त्यात समावेश आहे. नाशिक पदवीधरमध्ये आमदार डॉ. सुधीर तांबे हे आमचे उमेदवार आहेत. इतर उमेदवार निश्चित झालेले नाहीत.

 

शिक्षक आणि पदवीधरचे चारही मतदारसंघ काँग्रेसकडे आहेत. महाविकास आघाडीमध्ये जे निर्णय घेतले, त्याप्रमाणे आम्ही काम करतोय, असेही नाना पटोले यांनी या वेळी सांगितले.

दरम्यान, नाशिक पदवीधर मतदारसंघात नाशिक, नगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. माजी मंत्री थोरात आणि आमदार तांबे यांचा शिक्षण संस्थांच्या माध्यमातून या पाच जिल्ह्यांत मोठा संपर्क आहे. तसेच, महाविकास आघाडीचा फायदाही तांबे यांना होऊ शकतो.

या मतदारसंघासाठी भाजपचे नेते तथा विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू राजेंद्र विखे पाटील यांचे नाव चर्चेत आहे. राजेंद्र विखे पाटील यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेटमध्ये तब्बल २० वर्षे काम केले आहे. ते विद्यापीठाच्या व्यवस्थापन, विद्वावता, आणि सल्लगार परिषदेचे सदस्यही होते. लोणीतील प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठचे ते कुलपती आहेत. भाजपकडून विखेंना उमेदवारी मिळाल्यास नगरमधील विखे-थोरात यांच्यातच खऱ्या अर्थाने सामना रंगू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here