जामखेड प्रतिनिधी
दोन वर्षापासून रखडलेल्या खर्डा चौक ते लक्ष्मी चौकापर्यंत कामासाठी बांधकाम विभागाने आज दि. २७ रोजी पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणे काढण्यात आली आहेत. आता सुसज्ज रस्ता व खर्डा चौकाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे अशी माहिती बांधकाम विभागाने दिली आहे.
खर्डा चौक ते खर्डा असा वीस किलोमीटर अंतराच्या रस्त्यासाठी सहा कोटी रुपये मंजूर होते करमाळा चौक ते खर्डा पर्यंत रस्ताही झाला पण लक्ष्मी चौक ते खर्डा चौकापर्यंत सुमारे साडेपाचशे मीटर रस्त्याचे काम रखडले होते. काही दिवसांपूर्वी गटाराचे काम झाले नंतर बरेच दिवस काम रखडले होते तेव्हा परत अतिक्रमण झाले होते. बांधकाम विभागाने चार महिन्यांपूर्वी अतिक्रमण धारकांना नोटीसा बजावल्या होत्या पण अतिक्रमणे काढण्यात आली नव्हती खर्डा चौकाचे सुशोभित करण्यासाठी व रस्ता प्रश्न मार्गी लागण्यासाठी बांधकाम विभागाने आज पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणे हटविले खर्डा चौकात उपलब्ध जागेनुसार सुशोभीकरण करण्यात येणार आहे. तर पुढे रस्त्याच्या मध्यापासून साडेपाच – साडेपाच मीटर दोन्ही बाजूला म्हणजे अकरा मीटर डांबरीकरण करण्यात येणार आहे. यामुळे रहदारीची समस्या सुटणार आहे. खर्डा चौकात मोठ्या प्रमाणावर रहदारीची समस्या निर्माण होत होती ती आता सुटणार आहे. खर्डा चौकापासून ते लक्ष्मी चौकापर्यंत दुभाजक टाकावेत अशी मागणी नागरिकांकडुन होत आहे.
पुर्वी हा रस्ता फक्त सात मिटर एवढा रुंद होता. आता या रस्त्याच्या मध्यभागापासून दोन्ही बाजूने साडेपाच एकूण अकरा मीटर रुंदीकरण होणार आहे. दोन्ही बाजुने एक मीटरच्या साइडपट्या व नालीचे काँक्रीटकरण होणार आहे. तर लक्ष्मी चौकापासून पुढे खर्ड्यापर्यंत उर्वरित रस्त्याचे डांबरीकरण होणार आहे. जामखेड ते खर्डा रोड हा हैद्राबादहून शिर्डीकडे जाण्यासाठी साईभक्तांना जवळचा रस्ता असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रात्रंदिवस वाहतुक असते. आता या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम होणार असल्याने प्रवाशांना व वहातूक चालकांना दिलासा मिळणार आहे.
आज बांधकाम विभागाने पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणे हटवली यावेळी बांधकाम विभागाचे शाखा अभियंता शशिकांत सुतार, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर यांच्या सह मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.