जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – (सुदाम वराट)
राज्यात वाढत चाललेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जामखेड तालुक्यातील प्रशासनही अलर्ट झाले आहे. या अंतर्गत विविध उपाययोजना केल्या जात असून, तालुक्यातील दिघोळ येथे आज एकाच दिवशी १८ रुग्ण मिळून आले आहेत. आता फक्त दिघोळ गावातील कोरोना ची एकुण संख्या ५३ झाली आहे. सध्या आरोळे कोव्हिड सेंटर येथे ८६ जण उपचार घेत आहेत. आतापर्यंत सुमारे ३६०० कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांवर औषधोपचारासह चहा नाष्टा व दोन वेळच्या जेवणाची मोफत सोय आरोळे कोविड सेंटरने केली आहे. आताही समाजातील दानशूर व्यक्तींनी आरोळे कोविड सेंटरला मदत करावी असे आवाहन मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी केले आहे.
या पार्श्वभूमीवर तालुका प्रशासनाने मोठी मोहीम हाती घेतली असून अनेक उपाय योजना हाती घेतल्या आहेत. त्यानुसारच आज दि. २० मार्च रोजी तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी गटविकास अधिकारी परशुराम कोकणी व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बोराडे व महसूल कर्मचारी यांना बरोबर घेऊन दिघोळला भेट दिली. तसेच नागरिकांच्या घरोघरी जात व ध्वनीक्षेपकावरून कोरोना टेस्ट करण्याचे आवाहन केले. तर टेस्टचे प्रमाणही वाढवण्यात आले आहे.
तसेच येथे काही दिवसांचे लाॅकडाऊनही करण्यात आले आहे. तर दोनच दिवसांपूर्वी तालुक्यातील तहसीलदार विशाल नाईकवाडे, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, गटविकास अधिकारी परशुराम कोकणी व मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी शहरातील विविध भागात जनजागृती करत मास्क न वापरणाऱ्या लोकांविरोधात मोठी कारवाई केली होती. कोरोनाची वाढती पार्श्वभूमी पाहता जनतेने शासनाने घालून दिलेले सर्व नियम काटेकोरपणे पाळावेत तसेच प्रशासनालाही सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी केले आहे.
आरोळे कोविड सेंटरने आतापर्यंत ३६०० रूग्णांवर मोफत उपचार केले आहेत. आताही रूग्ण संख्या वाढत चालली आहे. सध्या ८६ रुग्ण येथे उपचार घेत आहेत. तालुक्यातील रूग्णांसह तालुक्याबाहेरील व जिल्ह्याबाहेर रूग्ण उपचारासाठी येतात त्याचा औषधोपचार, चहा नाष्टा व दोन वेळच्या जेवणाची मोफत सोय आरोळे कोविड सेंटर करते. मागील काळात आमदार रोहित पवार व अनेक दानशूर व्यक्तींनी आरोळे कोविड सेंटरला मोठ्या प्रमाणावर मदत केली होती.
सध्या आरोळे कोविड सेंटरला आर्थिक मदतीची गरज आहे. त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्तींनी आरोळे कोविड सेंटरला मुक्त हस्ते मदत करावी असे आवाहन
नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.