जामखेड न्युज——
सुरत चेन्नई महामार्गाला अहमदनगरच्या शेतकऱ्यांचा विरोध!
सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग (Surat-Chennai Greenfield Highway) हा अहमदनगर जिल्ह्यासाठी (Ahmednagar News) अतिशय महत्त्वाचा आहे. सध्या सूरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गसाठी आवश्यक जमीन अधिग्रहणाची कामे प्रगती पथावर आहेत. या मार्गासाठी आवश्यक भूमी अधिग्रहीत करण्यासाठी भुमापण प्रक्रिया अहमदनगर जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे.
मात्र अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी बांधव (Ahmednagar Farmer) या महामार्गाच्या भूमापन प्रक्रियेला विरोध करत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील राहुरी येथील खडांबे खुर्द या गावातील शेतकऱ्यांनी (Farmer) भुमापन प्रक्रियेला विरोध केला आहे.
या गावातील शेतकरी बांधवांनी जोपर्यंत आमच्या मागण्या लेखी स्वरूपात आम्हाला मिळत नाही तोपर्यंत भुमापण प्रक्रिया होऊ देणार नाही असे कडाडून सांगितले आहे. शेतकऱ्यांनी असा आक्रमक पवित्रा घेतला असल्याने सध्यातरी खडांबे खुर्द गावात भूमापन प्रक्रिया थांबली आहे. भूमापन करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना देखील भूमापन न करता माघारी परतावे लागले आहे.
सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग हा केंद्र सरकारचा एक महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्टला भारतमाला प्रकल्प अंतर्गत मूर्त रूप देण्यात येणार आहे. सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहीत केल्या जाणार आहेत.
या अनुषंगाने भूमापन प्रक्रिया करणे हेतू शेतकऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. जमीन मोजणीसाठी नोटिसा दिल्या नंतर 15 सप्टेंबर रोजी खडांबे खुर्द गावात महामार्गासाठी आवश्यक भूमापन मोजणी किंवा जमीन मोजणीचे काम सुरू करण्यात येणार होते. या अनुषंगाने गावातील शेतकरी बांधवांना नोटिसा देण्यात आल्या होत्या.
नोटिसा बजावल्या नंतर भू मापन कर अधिकारी खडांबे खुर्द गावात जमीन मोजणीसाठी दाखल झाले होते. मात्र, खडांबे खुर्द गावातील शेकडो शेतकऱ्यांनी या अधिकाऱ्याच्या भूमापन प्रक्रियेला विरोध केला आणि भूमापन प्रक्रिया थांबवली. यावेळी शेकडो शेतकर्यांनी आपल्या मागण्या संबंधित विभागाकडे पाठवण्यासाठी लेखी निवेदन देखील दिले आहे.
शेतकऱ्यांनी संबंधित विभागाला दिलेल्या लेखी निवेदनात अधिग्रहित केल्या जाणाऱ्या जमिनीचा दर शासनाने जाहीर करावा, सर्विस रोड बाबत संबंधित विभागाने आपली भूमिका नेमकी काय ते स्पष्ट करावे, याशिवाय महामार्ग शेतजमिनीच्या मध्यातून गेल्यानंतर उर्वरित राहिलेला शेतजमिनीचा भुभाग याविषयी सरकारने तसेच संबंधित विभागाने आपली भूमिका लेखी स्वरूपात स्पष्ट करावी या बाबींचा उल्लेख आहे.
या मागण्या पूर्ण केल्याशिवाय भुमापण प्रक्रिया होऊ देणार नाही असे खडांबे खुर्द गावातील शेकडो शेतकर्यांनी नमूद केले आहे. यावेळी गावातील शेकडो शेतकरी या ठिकाणी उपस्थित होते. याशिवाय कामगार तलाठी, भूमापन अधिकारी, सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गाचे भूमापन करणारे आर व्ही असोसिएट या एजन्सीचे अधिकारी देखील उपस्थित होते.
यावेळी शेतकरी बांधवांनी आमचा सरकारला विरोध नाही तर शासनाच्या चुकीच्या कार्यपद्धतीला विरोध असल्याचे सांगितले. आमच्या शेतजमिनी महामार्गासाठी जाणार आहेत अशा परिस्थितीत आम्हाला लेखी स्वरुपात महामार्गाची माहिती आवश्यक आहे असा पवित्रा या वेळी शेतकर्यांनी घेतला आहे. निश्चितच तूर्तास तरी खडांबे खुर्द गावात भुमापण प्रक्रिया मंदावली आहे.
जामखेड तालुक्यातील डोणगाव, अरणगाव, वंजारवाडी, फक्राबाद, पाटोदा, खामगाव, डिसलेवाडी, खांडवी, बावी, राजेवाडी, नान्नज, पोतेवाडी, चोभेवाडी, मार्गे परांडा तालुक्यातून पुढे सोलापूर, अक्कलकोट मार्गे हैदराबाद चेन्नई ला जाणार आहे.