जामखेड न्युज——
लसीकरण आणि योग्य उपचार करूनच लम्पीचे संकट रोखता येईल: डॉ. संजय राठोड
जामखेड महाविद्यालय आणि पशुसंवर्धन विभाग यांचे संयुक्त विद्यमाने नाहुली येथे लम्पी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख तज्ञ मार्गदर्शक म्हणून पशुधन अधिकारी डॉ. संजय राठोड बोलत होते. लम्पी आजारापासून आपल्या जनावरांची विशेष काळजी घेतली पाहिजे. तसेच लम्पी विषयी शास्त्रीय माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी यासाठी जामखेड महाविद्यालयाने ही लोकोपयोगी मोहीम हाती घेतलेली आहे. लम्पी आजाराविषयी काही गैरसमज दूर होणे गरजेचे आहे.
1)लंपी आजार माणसांना होत नाही
2) दूध प्यायल्याने हा आजार होत नाही
3) हा आजार संसर्गजन्य जरी असला तरीही तो फक्त जनावरांनाच होतो माणसांना होत नाही.
४) सर्व जनावरांना लसीकरण करणे गरजेचे आहे.
५) आजार झालेले जनावर विलगीकरण करणे.
इत्यादी बाबींवर लक्ष देणे गरजेचे आहे. तज्ञांचे मार्गदर्शन व योग्य उपचार यामुळेच लम्पीचे संकट रोखता येणार आहे. असे मत डॉ. राठोड यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान प्राचार्य डॉ. सुनिल नरके यांनी भूषविले. आपल्या मनोगतात भारत हा जगातील सर्वात जास्त पशुधन असणारा देश असूनही भारताचे दुग्ध उत्पन्न जगात सर्वात जास्त नाही, ही वस्तुस्थिती प्राचार्य डॉ. नरके यांनी मांडली. यापुढे महाविद्यालयाच्या माध्यमातून तालुक्यातील शेती आणि शेतकरी यांच्यासाठी नवनवीन उपक्रम आणि योजना राबवण्यासाठी महाविद्यालया पुढाकार घेणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. शेतकऱ्याने दुग्ध व्यवसायाकडे शेतीपूरक व्यवसाय म्हणून पहावे व आपले उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमात ग्रामसेविका इंगोले मॅडम, ग्रामपंचायत सदस्य श्री. दिलीप बहिर श्री.रावसाहेब जाधव, श्री रणजीत बहिर, श्री धनराज बहिर, श्री बबन जाधव, चेअरमन शांतीलाल गर्जे, योगेश गर्जे तसेच गावातील शेतकरी, ग्रामस्थ, विद्यार्थी, तरुण यांचा मोठा प्रतिसाद लाभला. अनेक शेतकऱ्यांनी लम्पी आजाराविषयी आपल्या शंकांचे निरसन तज्ञांकडून करून घेतले. महाविद्यालयाच्या या अभिनव उपक्रमाबद्दल शेतकरी वर्गाने जामखेड महाविद्यालयाचे कौतुक करत मा. प्रा. डॉ. सुनिल नरके आणि सर्व प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे ठिकाणीच ज्यांच्या जणावरांचे लसीकरण राहिले होते त्यांची नोंदणी करून त्यांना लस देण्याची सोय महाविद्यालयाकडून करण्यात आली.
या समाज उपयोगी कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचलन प्रा. योगेश पेटकर यांनी केले, तर प्रास्ताविक प्रा. ऋषीकेश देशमुख व सर्वांचे आभार प्रा.तुषार मिसाळ यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. मोहिते, प्रा. अडाले, प्रा. धिंदळे, श्री. विनोद बहीर आणि प्रा. तुकाराम घोगरदरे यांनी परीश्रम घेतले.