जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज——
नवनवीन उपक्रम राबविण्यासाठी प्रसिद्ध असलेले प्राचार्य श्रीकांत होशिंग यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात अनुभवातून शिक्षण मिळावे म्हणुन विद्यालयात वनौषधी उद्यान उभारले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तकात असलेली झाडे, वेली, वनौषधी वनस्पती विद्यालयात अनुभवयास मिळत आहेत.

लाजाळू शहरातील मुलांना फक्त पुस्तकात पाहता येते पण विद्यालयाच्या बागेत लाजाळू असल्याने विद्यार्थी कुतुहलाने हात लावून झाड कसे लाजते हे पाहतात. तसेच अनेक वनौषधी वनस्पती उद्यानात आहेत.

ल. ना. होशिंग विद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत होशिंग यांच्या संकल्पनेतून पुस्तकातली झाडे विद्यालयाच्या अंगणात अवतरली आहेत. विद्यालयातील मुख्य मैदानाच्या कडेला दुर्मिळ वनौषधींचे उद्यान साकारण्यात आले आहे. या उद्यानात ३७ प्रकारच्या दुर्मिळ वनौषधींची लागवड करण्यात आली आहे.

जामखेड तालुका मिडीया क्लबने शनिवारी ल.ना. होशिंग विद्यालयात उभारण्यात आलेल्या वनौषधी उद्यानाला भेट दिली. विद्यालयाने हाती घेतलेल्या उपक्रमाची सविस्तर माहिती जाणून घेतली. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक शिक्षण देण्याच्या उपक्रमाचे मिडीया क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी कौतूक केले. यावेळी प्राचार्य श्रीकांत होशिंग यांनी या उपक्रमाची सविस्तर माहिती पत्रकारांना दिली. यावेळी तालुकाध्यक्ष सुदाम वराट, सचिव सत्तार शेख, मिडीया क्लबचे पदाधिकारी किरण रेडे, अविनाश बोधले, संजय वारभोग, धनराज पवार, राजू भोगील, अजय अवसरे आदी उपस्थित होते.