Friday, February 13, 2026
Home ताज्या बातम्या साकत ग्रामपंचायततर्फे घराघरात तिरंगा वाटप करत ध्वज फडकविण्याविषयी मार्गदर्शन – सरपंच हनुमंत...

साकत ग्रामपंचायततर्फे घराघरात तिरंगा वाटप करत ध्वज फडकविण्याविषयी मार्गदर्शन – सरपंच हनुमंत पाटील

0
257
जामखेड न्युज——
भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, जनतेच्या मनात स्वातंत्र लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक/ क्रांतिकारक/ स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे,  स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुलिंग कायम तेवत रहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात राहावी, या उद्देशाने या देदीप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण करण्यासाठी १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे “घरोघरी तिरंगा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. 
घरोघरी तिरंगा या उपक्रमाचा भाग म्हणून साकत ग्रामपंचायत मध्ये आमदार रोहित पवारांच्या हस्ते ध्वज दाखवून शुभारंभ करण्यात आला यावेळी गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, पंचायत समितीचे माजी सभापती सुर्यकांत मोरे, संजय वराट, सरपंच मनिषा पाटील, हनुमंत पाटील,  उपसरपंच राजू वराट, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र वळेकर सह सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामपंचायत मार्फत सर्वाना मोफत ध्वज देण्यात आले तसेच ज्यांना ध्वज मिळाला नसेल त्यांनी ग्रामपंचायत मधुन ध्वज घेऊन जावा असे आवाहन  सरपंच हनुमंत पाटील यांनी केले आहे. 
    यावेळी सरपंच हनुमंत पाटील यांनी ध्वज फडकविण्याबाबतचे नियम ग्रामस्थांना समजावून सांगितले. 
प्रत्येक नागरिकाने खालील बाबीचे काटेकोर पालन करावे
तिरंगा ध्वज फडकविताना केशरी रंग वरच्या बाजूने असावा.
तिरंगा ध्वज उतरविताना काळजीपूर्वक सन्मानाने उतरवावा.
१३ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा’ उपक्रमांतर्गत लावण्यात आलेले ध्वज अभियान कालावधीनंतर ध्वज फेकला जावू नये, तो सन्मानाने जतन करून ठेवावा.
अर्धा झुकलेला, फाटलेला, कापलेला ध्वज कुठलेही परिस्थितीत लावला जावू नये.
इतर प्रयोजनासाठी ध्वजाचा वापर करता येणार नाही.
कोणत्याही व्यक्ती किंवा वस्तूला मानवंदना देण्यासाठी ध्वज खाली आणता येणार नाही.
खासगी अंत्यसंस्कारासह जे कोणतेही असेल अशा कोणत्याही स्वरुपातील आच्छादन म्हणून ध्वजाचा वापर करता येणार नाही.
ध्वजाचा कोणत्याही प्रकारच्या पोशाखाचा अथवा गणवेशाचा भाग म्हणून वापर करता येणार नाही किंवा त्याचे उशा, हातरुमाल, हात पुसणे यांवर किंवा कोणत्याही पोषाख साहित्यावर भरतकाम करता येणार नाही किंवा छपाई करता येणार नाही.
ध्वजावर कोणत्याही प्रकारची अक्षरे लिहिता येणार नाहीत.
ध्वजाचा कोणतीही वस्तू घेण्याचे, देण्याचे, बांधण्याचे किंवा वाहून नेण्याचे साधन म्हणून वापर करता येणार नाही.
ध्वजाचा वक्त्याचा टेबल (डेस्क) झाकण्यासाठी वापर करता येणार नाही किंवा वक्त्याच्या व्यासपीठावर आच्छादता येणार नाही.
ध्वजाचा जाणीवपूर्वक भूमिशी किंवा जमिनीशी स्पर्श होऊ देऊ नये किंवा तो पाण्यावरुन फरफटत नेऊ नये.
ध्वज मोटार वाहन, रेल्वे गाडी, जहाज किंवा विमान यांच्या झडपावर, छतावर, बाजूंवर किंवा पाठीमागच्या बाजूस आच्छादता येणार नाही.
ध्वजाचा एखाद्या इमारतीचे आच्छादन म्हणून वापर करता येणार नाही.
फाटलेला अथवा चुरगळलेला ध्वज लावण्यात येऊ नये.
ध्वज अन्य कोणत्याही ध्वजासोबत किंवा ध्वजांसोबत एकाच वेळी एकाच काठीवर फडकवू नये.
ध्वजाचा तोरण, गुच्छ अथवा पताका म्हणून किंवा अन्य कोणत्याही प्रकारे शोभेसाठी उपयोग करू नये,
ध्वज फाटेल अशा प्रकारे तो लावू नये किंवा बांधू नये.
  अशा प्रकारे ध्वज संहिता नियमावलीचे पालन करण्याचे  आवाहन सरपंच हनुमंत पाटील यांनी नागरिकांना केले आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!